शेतकऱ्यांना नडू नका, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पीक विमा कंपन्यांना इशारा

एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि., भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी विधानभवनातील दालनात अंबादास दानवे यांनी बैठक घेऊन पीक विम्याच्या परताव्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना पीक विमा मदत मिळत नसून, आधीच अतिवृष्टी व संततधार यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक घेण्यात यावी.

    मुंबई – अतिवृष्टी, संततधार यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. त्यात पीक विम्याचा परतावाही शेतकऱ्यांना मिळत नाही. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांना नडू नका असा इशारा पीक विमा कंपन्यांना दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी, यासाठी आज आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या पीक विम्या कंपनीच्या प्रभादेवी येथील मुख्यालयाला भेट देऊन कंपनी प्रशासनाला जाब विचारला.

    दरम्यान, एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि., भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी विधानभवनातील दालनात अंबादास दानवे यांनी बैठक घेऊन पीक विम्याच्या परताव्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना पीक विमा मदत मिळत नसून, आधीच अतिवृष्टी व संततधार यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी दूरध्वनीद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. या मागणीनंतर आज कृषी मंत्र्यांनी सर्व पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक बोलावली आहे.

    राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानानंतर पीकविमा नाकारण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांवर आहे. विमा कंपन्या एकप्रकारे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खातायत. मदतही वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना आग्रही भूमिका मांडत असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, शाखा क्र.१९३च्या शाखाप्रमुख संजय भगत, माजी महापौर व महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव, शाखा संघटक कीर्ती म्हस्के, युवासेना शाखाधिकारी चिंतामणी मोरे, रेखा देवकर व शिवसेना पदाधिकारी तसेच आयसीआयसीआय लोंबार्डचे अधिकारी उपस्थित होते.