अलमट्टी धरणाची उंचीला शासनाच्या माध्यमातून विरोध ; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती 

प्रसंगी जनअंदोलन करण्याचा इशारा

  शिरोळ : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय  घेतला असला तरी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्याला प्रखर विरोध केला जाईल, प्रसंगी मोठे जन आंदोलन केले जाईल, कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला जो धोका निर्माण होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय रद्द करण्यासाठी आग्रही मागणी करणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
  सध्या अस्तित्वात असलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५१९.६०० मीटर इतकी आहे, अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १२० टीएमसी आहे, असे असताना कोल्हापूर व सांगली जिल्ह्याने २००५,२००९,२०१९ व २०२१ चा प्रलयकारी महापूर अनुभवला आहे, विशेषतः या सर्व महापुराच्या काळात शिरोळ तालुक्याने सर्वात मोठे नुकसान सहन केले आहे,नव्या धोरणानुसार कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची जवळपास ५ मीटरने वाढवताना धरणातील पाणीसाठ्याची क्षमता २०० टीएमसी इतपत वाढवणार असल्याचे समजते.

  सर्वात जास्त झळ कोल्हापूर, सांगलीला
  अलमट्टी धरणाची उंची याप्रमाणे जर वाढवली तर नदीपात्रातील पाण्याचा फुगवटा मोठ्या प्रमाणात वाढणार असून याची सर्वात मोठी झळ कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसणार आहे,अनियमित पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली तर कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यातील लाखो नागरिकांना स्थलांतरित करावे लागणार आहे.

  कर्नाटक सरकारचा डाव रद्द करू
  कोल्हापूर सांगली जिल्ह्याचे व या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आपला कायम विरोध राहील व यासाठी आपण महाराष्ट्र शासनाकडे आग्रही राहून कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा डाव सर्वांना सोबत घेऊन रद्द करण्यास भाग पाडू प्रसंगी या प्रश्नाबाबत व्यापक जनआंदोलन उभारू असेही माजी मंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे.