कोकणात आज मान्सूनचा ‘ऑरेंज अलर्ट’; हवामान विभागाची माहिती

    पुणे : राज्यासह कोकणात (Konkan) पाऊस अद्याप स्थिरावलेला नाही. मात्र, आज रविवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र (Meteorology) विभागाने दिला आहे.

    राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तसेच, उर्वरित राज्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी येथे सायंकाळपर्यंतचा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. दक्षिण कोकणात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे.

    सध्या दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत मान्सून सक्रिय (Monsoon Active) आहे. तर, पश्चिम किनाऱ्यावर सक्रिय असलेल्या समांतर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता काहीशी वाढली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम असून झारखंड ते विदर्भ हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी विदर्भ आणि कोकणात पुढील चार दिवस मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

    आज पावसाचा यलो अलर्ट
    ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या ठिकाणी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.