Orders to prosecute illegal felling of trees and charcoal drivers; Pune Division Senior Forest Officer Deepak Pawar inspected the concerned forest officers as well

  पाटस : दौंडच्या पूर्व भागातील मलठण, राजेगाव, वाटलुज नायगाव या भागांतील वनक्षेत्रातील बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा खाणचालक आणि मालक यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी दीपक पवार यांनी दिले आहेत‌. त्यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीव्र नाराजी व्यक्त करीत धारेवर धरुन त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याचे संकेत दिले.

  या भागातील काही राजकीय मंडळींचा समावेश

  मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील पुर्व भागातील मलठण, राजेगाव, वाटलुज, नायगाव या भागातील वनक्षेत्रातील वनजमीनीत बेकायदा वृक्षतोड करून कोळसा खाणी सुरू होत्या. या व्यवसायात या भागातील काही राजकीय मंडळींचा समावेश असल्याने खुलेआम बेकायदा वृक्षतोड व कोळसा खाणी या वनविभागाचे स्थानिक वनअधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू होत्या.

  कर्मचारी या प्रकाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप

  याबाबत मलठण ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्याकडे लेखी तक्रार ही केली होती. मात्र, संबंधित वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या मालक व चालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. उलट त्यांना फरार होण्यास मदत केली. परिणामी संबंधित आरोपी हे राजरोसपणे फिरत आहेत. स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचारी या प्रकाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप मलठण ग्रामस्थांनी केला होता.

  गुन्हे दाखल करून ठोस अशी कारवाई

  संबंधित बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या मालकांवर तसेच या व्यवसायिकांना पाठीशी घालणाऱ्या तालुका वनपरिक्षत्र अधिकारी आणि स्थानिक वनपाल, वनसंरक्षक व वनकर्मचारी यांच्या वर गुन्हे दाखल करून ठोस अशी कारवाई करावी अशी मागणी मलठण ग्रामस्थांनी पुणे विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची त्वरित दखल घेत पुणे विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार यांनी बुधवारी (दि ७) तालुक्यातील मलठण, राजेगाव, वाटलुज, नायगाव या भागातील वनक्षेत्राताला घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षात पाहणी केली.

  वनक्षेत्रातील वनजमीनीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड

  यावेळी वाटलुज, नायगाव, राजेगाव, मलठण या भागातील वनक्षेत्रातील वनजमीनीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तब्बल ७ हेक्टर च्या आसपास वनक्षेत्रांमध्ये बेकायदा वृक्षतोड करण्यात आल्याचे ही निदर्शनास आले. या बेकायदा वृक्षतोडीमुळे वनक्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. तर वाटलुज ,नायगाव, राजेगाव या परिसरात बेकायदा कोळसा खाणी सुरू असल्याचे यावेळी पाहणी दरम्यान दिसुन आले तर काही ठिकाणी वनक्षेत्रात बेकायदा माती उत्खनन केले असल्याचे ही आढळून आले. यावेळी पवार यांनी स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारत ग्रामस्थांसमोर धारेवर धरले.

   

  याप्रसंगी ग्रामस्थांनी तालुक्यातील वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार खुलेआम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ वनअधिकारी दीपक पवार यांना दिली. हा सर्व प्रकार सुरू असताना ग्रामस्थांनी वेळोवेळी स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तोंडी आणि लेखी कळवले मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संबंधित वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या मालकांवर अद्याप पर्यंत तालुका वन अधिकारी यांनी कारवाई करण्याचे टाळाटाळ केली आहे असुन संबंधितांना पाठीशी घातले जाते अशी माहिती यावेळी दिली. स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी ही ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे यावेळी केली.

   

  यावेळी ग्रामस्थानी वनक्षेत्रांमध्ये कशाप्रकारे बेकायदा वृक्षतोड कशा पद्धतीने केली आहे निदर्शनास आणून दिले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी दीपक पवार यांनी स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले हा सर्व प्रकार होत असताना तुम्ही का रोखले नाही? संबधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कारवाई का केली नाही? यावेळी पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत घटनास्थळी त्वरित पंचनामा करून बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच यासंदर्भात वन अधिकारी आणि कर्मचारी यांची ही सखोल चौकशी करून दोषी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठोस अशी कारवाई केली जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

   

  मलठण ग्रामपंचायत चे उपसरपंच गोरख कोपनर, ग्रामपंचायत सदस्य अभिजित चौधरी, संकेत दळवी, माजी सरपंच नवनाथ थोरात, शेतकरी पिरानी देवकाते, लतिफ काळे, लालासो देवकाते,गोरख वाघमोडे, अमर परदेशी, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आनंता शिंदे, दौंड वनपरिक्षत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यासह वन अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.