
'उमेद' अभियानाचा उपक्रम : महिला बचतगटांचा सहभाग
सोलापूर : ‘उमेद’ अभियानच्या माध्यमातून बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात मिलेटस खाद्यपदार्थाचा महोत्सव प्रायोगिक तत्वावर होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) इशाधिन शेळकंदे यांनी दिली आहे.
कासाळगंगा नदीकाठच्या पंढरपूर, सांगोला तालुक्यातील बचतगटांच्या महिलांना आत्मा च्या माध्यमातून सगरोळी ( जिल्हा नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातून ‘मिलेटस’ खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. उत्पादनासोबत पॅकिंग, मार्केटिंगची माहिती देण्यात आली आहे. अशा प्रशिक्षित भगिनीनी ज्वारीसह बाजरी, नाचणी पासून तयार केलेले पौष्टीक, आरोग्यदायी, रुचकर खाद्यपदार्थ प्रदर्शनात असतील. प्रदर्शनात ठेवण्यात आलेले खाद्यपदार्थ खरेदी करता येणार असून उत्पादक ते थेट ग्राहक ही संकल्पना पुढे नेण्यास मदत होणार आहे. तरी मिलेटस खाद्यपदार्थ महोत्सवास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन येथील आरोग्यदायी व पौष्टिक खाद्यपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आरोग्यदायी खाद्यपदार्थ
प्रदर्शन आणि विक्री उपक्रमांतर्गत उपलब्ध होणारे आरोग्यदायी ‘मिलेटस’ खाद्यपदार्थ खाली दिल्याप्रमाणे आहेत :
* ज्वारीची शेव, शंकरपाळ्या, चकली, बिस्कीट, लाडू
*नाचणीचे बिस्कीट, लाडू
* ज्वारी व बाजरीचे मिक्स सूप
* थालीपीठ भाजणी
* दलिया, मिक्स बाजरी थालीपीठ
* बाजरी व ज्वारीच्या लाह्या