… नाहीतर राजकीय करिअर संपवून टाकेन; भाजपच्या गणेश बिडकर यांना पुन्हा धमकी

भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना पुन्हा फोनवरुन धमकी देण्यात आली आहे. त्यांना खंडणीची मागणी करण्यात आली असून, रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

    पुणे : भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना पुन्हा फोनवरुन धमकी देण्यात आली आहे. त्यांना खंडणीची मागणी करण्यात आली असून, रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्यानंतर बिडकर यांनी तातडीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिडकर यांना यापूर्वीही फोनवर धमकी देऊन खंडणी मागितली होती.
    पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गणेश बिडकर हे लष्कर परिसरात बागबान हॉटेल परिसरात होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने बिडकर यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन तसेच व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. त्यानंतर गणेश बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
    दरम्यान, खंडणी विरोधी पथकाकडून याचा तपास सुरू आहे. दरम्यान, गणेश बिडकर यांना यापूर्वी मार्च २०२३ मध्ये खंडणीसाठी फोन आले होते. बिडकर यांच्या मोबाईलवर तेव्हा व्हॉट्सअॅप कॉल करुन २५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करुन खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकू, बदनामी करु अशी धमकी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा फोन आल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.