…अन्यथा गिरण्यांच्या प्रश्नावर देशव्यापी जनआंदोलन छेडले जाईल; राज्यपालांच्या भेटीनंतर सचिन अहिर यांचा इशारा

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटून देशातील एनटीसी गिरण्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तरीही मार्ग नाही निघाला तर पुढच्या महिन्यात एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर देशव्यापी जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रीय समन्वय कृती समिती आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिला आहे.

  मुंबई : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटून देशातील एनटीसी गिरण्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तरीही मार्ग नाही निघाला तर पुढच्या महिन्यात एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर देशव्यापी जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रीय समन्वय कृती समिती आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिला आहे.

  गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून उपासमारीचे जीवन जगणाऱ्या मुंबईसह महाराष्ट्रातील सहा आणि महाराष्ट्राबाहेरील मिळून २२ एनटीसी गिरण्यांमधील कामगारांच्या व्यथेकडे लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी एका शिष्टमंडळाद्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची “राजभवन” येथे भेट घेतली. सचिन अहिर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गिरण्या पूर्ववत चालविण्यासाठी आपण पंतप्रधानाना विनंती करावी, अशी आग्रहाची मागणी केली आहे. केंद्र सरकारचे धोरण सुस्पष्ट असावे. कामगारांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या या गिरण्यांच्या प्रश्नावर सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. विशेषत: बीएमएस सारखी संघटना आमच्या बरोबर लढ्यात उतरली आहे, असे सचिन अहिर यांनी राज्यपाल यांच्या भेटी प्रसंगी स्पष्ट केले.

  कामगारांना अर्धा पगारही वेळेत दिला जात नाही. आम्ही न्यायालयात पूर्ण पगार देण्याचा लढा जिंकल़ो आहे. पण निकालाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आज इंदू नं.६ येथे उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेच्या टिडिआर पोटी राज्य सरकारने काढलेल्या कोट्यवधी रुपयांचा उपयोग या गिरण्यांच्या विकासावर केला तर या गिरण्या पूर्ववत चालू शकतील असे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले.

  कामगारांकडे खाजगीकरणावर गिरणी चालविता येईल अशी एखादी सक्षम योजना आहे का? तसे असेल तर ती पुढेआणावी आणि आजच्या घडीला ती योजना योग्य ठरेल, असे कोश्यारी यांनी शिष्टमंडळाशी बोलतांना सांगितले. गिरण्या सहकारी तत्त्वावर चालविण्याचा मनोदय केंद्राकडे व्यक्त करण्यात आला.पण सरकारने अनास्था दाखवली असे सचिन अहिर यांनी या भेटी प्रसंगी सांगितले.

  गिरण्यांच्या धोकादायक चाळीत रहाणाऱ्या भाडेकरूंची अवस्था आज दयनीय झाली आहे, असे सांगून केंद्र सरकार स्वतः या गिरण्यांच्या चाळींचा पुनर्विकास करत नाही आणि त्यांनाही करु देत नाही. राज्यपाल यांनी एनटीसी मिल आणि गिरण्यांच्या चाळी बाबत गा-हाणी ऐकून त्यावर सहानुभूती पूर्वक विचार केला जाईल,असे सांगितले. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरण्यांचा तिढा केंद्राने त्वरीत सोडवावा अशी मागणी केली.

  दरम्यान शिष्टमंडळात सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर,सुनिल बोरकर, शिवाजी काळे, जी.बी.गावडे,अचलपूर फिन्ले टेक्सटाइल मिलचे अध्यक्ष राजेश खोलापुरे, सरचिटणीस रामसुमेर बुंदले, उपाध्यक्ष पंकज गोखले, बार्शी टेक्सटाइल मिलचे अध्यक्ष अभिजित चव्हाण,सरचिटणीस नागनाथ सोनवणे, समीर शेख होते.