आमची माळ गोरगरीब जनतेशी जोडलेली ; हसन मुश्रीफ यांचे मत

लोककल्याणासाठी उभारलेले विकास कार्य व आणलेल्या शासकीय योजना यावर ‘मुश्रीफ’ नावाचा शिक्का आहे. हा शिक्का पुसणे त्यांच्या पुढील सात पिढ्यांना शक्य नाही. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात गोरगरीब सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ बिळातून कालच बाहेर पडलेल्यांना शक्य नाही.

  मुरगूड :  लोककल्याणासाठी उभारलेले विकास कार्य व आणलेल्या शासकीय योजना यावर ‘मुश्रीफ’ नावाचा शिक्का आहे. हा शिक्का पुसणे त्यांच्या पुढील सात पिढ्यांना शक्य नाही. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात गोरगरीब सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ बिळातून कालच बाहेर पडलेल्यांना शक्य नाही. असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी केला.

  चिमगाव (ता. कागल) येथे दहा कोटी विकास निधीतून उभारलेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्नपूर्णा शुगरचे संस्थापक संजयबाबा घाटगे होते. चिमगाव ग्रामपंचायतच्या मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेले सांस्कृतिक सभा मंडप हॉल अंतर्गत रस्ते पानंद रस्ते, गैबी देवालय सुशोभीकरण व बांधकाम कामगार सुरक्षा संच वितरण या विकास कामाचे उदघाटन आमदार हसन मुश्रीफ संजयबाबा घाटगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

  ज्या लोक कल्याणकारी योजना मी जन्मास घातल्या, ज्यासाठी वीस वर्षे झटलो, पाठपुरावा केला, कायदेशीर तरतुदी केल्या, जनतेपर्यंत पोहोचलो, अंमलबजावणी केली, ज्या योजना ‘मुश्रीफ पॅटर्न’ म्हणून राज्यात नव्हे तर देशभर ओळखल्या जातात. त्या योजना आपणच केल्याचा बनाव कोणीतरी करत आहेत. हा मनाचा कद्रुपणा(कोतेपणा) पहाण्याचा प्रसंग कागलच्या इतिहासात प्रथमच येत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

  संजय बाबा घाटगे म्हणाले, मुश्रीफ हे लोकांच्या उंबऱ्या पर्यंत पोहोचलेले नेते आहेत. परितक्त्या, निराधार, वंचित, वयोवृद्ध नागरिकांसाठी आधार असलेली पेन्शन, विधवा सन्मान योजना यातून त्यांची तळमळ दिसून येते. सत्ता लोकांसाठी आहे. सत्तेचे मालक लोक आहेत. या भूमिकेतून कार्य करणाऱ्या मुश्रीफ यांची साथ सूर्य उत्तरेला उगवला तरी सोडणार नाही.

  सव्वा सात लाखाची खेप
  शिवसेनेचे मारुती पुरीबुवा म्हणाले, सदस्य झाल्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे कागलला फेऱ्या मारल्या. त्यांनी प्रत्येक फेरीला सव्वासात लाख रु चा निधी या प्रमाणे ७ कोटी ३७ लाखांचा निधी चिमगावला दिला. जनकल्याणाचे काम घेऊन मुश्रीफ यांच्या दारात गेलो आणि काम झाले नाही असा दिवस उगवला नाही. मुश्रीफ यांनी गावासाठी दिलेले योगदान चिमगावकर कधीही विसरणार नाहीत.

  कार्यक्रमास स्वागत अर्जुन एकल प्रास्ताविक प्रकाश बापू एकल, सूत्रसंचालन ए एन पाटील यांनी केले. आभार नामदेव मांगले यांनी मानले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, मारुती पुरीबुवा यांचे मनोगत झाले. यावेळी मनोज फराकटे, दिग्विजय पाटील, विकास पाटील, रणजित सूर्यवंशी, सरपंच रुपाली आंगज, नामदेव एकल, तानाजी एकल, प्रकाश एकल, रामचंद्र आंगज, निवृत्ती करडे, बाळू आंगज, आनंदा करडे, नारायण एकल, जानबा पाटील, विश्वास चौगले, निलेश शिंदे, रणजित एकल, प्रमिला नाईक, बाळासो इंगळे, साताप्पा आंगज, ग्रा पं सदस्य पूजा आंगज, छाया आंगज, सुनीता गुरव, सुनीता मुसळे, स्वप्नाली अवघडे, छाया भोई उपस्थित होते.