ज्वारीवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव, मावळ तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कडब्यावर परिणाम होण्याची शक्यता

बहुतांश ठिकाणी ज्वारी पिकावर चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जनावरांना चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्यावर परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. उत्पन्नात देखील घट होण्याची भीती आहे.

  मावळ : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या हंगामातील अर्थकारणाची मदार यंदा रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकावरच असून, सध्या काही ठिकाणी ज्वारीचे पीक समाधानकारक अवस्थेत दिसत आहे. परंतु असे असले तरी देखील बहुतांश ठिकाणी त्यावर चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जनावरांना चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्यावर परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. उत्पन्नात देखील घट होण्याची भीती शिरगाव, साळुंब्रे, सांगवडे, गहुंजे, दारुंब्रे, परंदवडी, गोडूंब्रे आदी भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा पिके चांगली दिसत असली तरीदेखील शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम आहे.

  यंदाच्या खरीप हंगामात शेवटी शेवटी निसर्गाच्या अवकृपेमुळे बाजरीचे काही प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात ज्वारी या पिकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत शिवाय ग्रामीण भागातील कोरडवाहू शेती करणारे शेतकरीही याच पिकाकडे डोळे लावून बसले होते. सुरुवातीलाच जमिनीत ओल नसल्यामुळे ज्वारीच्या पेरण्या काहीशा उशिराने झाल्या. मध्यंतरी बदलत्या वातावरणात पिके बऱ्यापैकी फुलली. आता बहुतांश ठिकाणी ज्वारीचे पीक हे फुलोरा अवस्थेत आले आहे. तर मध्य फेब्रुवारीत काढणीला सुरुवात होईल असे दिसते. मागील महिन्यात पडलेल्या आवकाळी पावसामुळे आणि गेले तीन ते चार दिवस सलग पडत असलेल्या धुक्यामुळे ज्वारीवर चिकट्या या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

  सुरुवातीलाच जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे ज्वारीचा पेरा उशिरा झाला आहे. आता पुढच्या महिन्यात ज्वारी काढण्यात येतील. मात्र सध्या ज्वारीवर मोठ्या प्रमाणात चिकटा रोग पडल्यामुळे पिकांचे उत्पन्नात घट होते की काय या भीतीपोटी शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र या भागात निर्माण झाले आहे. शिवाय जर रोगाचे निर्मुलन झाले नाही, तर होणारा कडबा जनावरांना खायला घालावा की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये सध्या या भागातील शेतकरी आहेत.

  मावळात यावर्षी ज्वारी हे पिक ९१० हेक्टर क्षेत्रावर आहे. अर्थातच त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे. बहुतांश ठिकाणी ज्वारीची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसत असून चिकट्याचा प्रादुर्भाव काही ठिकाणी झाला आहे. कृषी विभाग प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करत आहे.

  - दत्ता पडवळ, कृषी अधिकारी, मावळ तालुका

  यावर्षी शेतात ज्वारीच पिक चांगल आलं आहे परंतु काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने आणि धुक्याने काही ठिकाणी ज्वारीवर चिकटा, मावा आणि करपा रोग पडला आहे. तो जास्त न वाढता याचे निर्मुलन झाले तर चिंताच मिटेल.

  - सुरेश राक्षे, शेतकरी