मजुरांच्या कमतरतेमुळे भात कापणी लांबणीवर ;  ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

भातकापणीच्या सुरवातीलाच परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती पण आता थोडी विश्रांती घेतल्याने भात कापणीला आता वेग आला आहे. भुदरगड तालुक्यासह पिंपळगाव परिसरात आता भात कापणीला जोरात सुरू झाली आहे असून, अधुन मधून ढगाळ वातावरणाच्या भितीने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  भुदरगड : भातकापणीच्या सुरवातीलाच परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती पण आता थोडी विश्रांती घेतल्याने भात कापणीला आता वेग आला आहे. भुदरगड तालुक्यासह पिंपळगाव परिसरात आता भात कापणीला जोरात सुरू झाली आहे असून, अधुन मधून ढगाळ वातावरणाच्या भितीने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले चार, पाच महिने काबाडकष्ट करणारा बळीराजा आता भात कापणी करण्यासाठी बालचमुना घेऊन गड्या आपला शिवार बरा म्हणत वाट धरू लागला आहे.

  भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव परीसरात भात कापणीला आता जोरदार सुरवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पिक पदरात घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. या मुळे एकच धांदल उडाली आहे. एकमेकांना मजूर मिळेनासे झाले आहेत मजूरा अभावी पिक वाया जाते कि काय अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. यातच अधूनमधून वातावरणात सतत बदल होत असल्याने तुरळक पाऊस जरी पडला तरी हाती आलेल्या भात पिकाचे नुकसान होणार आहे.

  बैलजोडी पाळण्याकडे शेतकऱ्याची पाठ  
  भात पिकाची मळणी करण्यासाठी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सुध्दा बैलजोडी शिलक राहिलेली नाही. ग्रामीण भागात पूर्वी बैलांच्या सहाय्याने भात मळणी केली जात असे पण शेतकरी दूध व्यवसायाकडे वळल्याने बैलजोडी पाळण्यासाठी शेतकरी वर्गाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी बैलजोडी सध्या परवडत नाही असे सांगताना दिसत आहेत. ग्रामीण भागात सध्या बैलांच्या चारदोन जोड्या सोडल्या तर भात झोडपण्याचे सत्र सध्या जोरात सुरु आहे. तर काही ठिकाणी यांत्रिक पध्दतीने मशीनद्वारे भाताची मळणी केली जात आहे.

  यामुळे थोड्याच दिवसांत सर्जा-राजा कायमचा बंद होतोय की काय अशी अवस्था ग्रामीण भागातून पाहावयास मिळत असुन युवक वर्ग याकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे. अशाच पद्धतीने शेतीची मशागत सुध्दा बैलजोडी ऐवजी यांत्रिकीकरणाद्वारे बळीराजा शेतीची मशागत करत आहे. अशा अनेक पध्दतीने बळीराजा आपला शेती व्यवसाय सांभाळत आहे.

   मजूर मिळत नसल्याने एकमेकांच्यात आदलाबदल
  कापणीचा हंगाम आता जोरात सुरू झाल्यामुळे सर्व शेतकरी डोक्यावर लाकडी खाटोलेसह भात कापणी करत आहेत. मजूर मिळत नसल्याने एकमेकांच्यात आदलाबदल (पैरा) पद्धतीने भात कापणी करून घेत आहेत. अशा पद्धतीने पिंपळगावसह दिंडेवाडी, मानवळे, पाल, हेळेवाडी, नागणवाडी, बेगवडे, आरळगुंडी, भेंडवडे, नांगरगाव, बारवे आदी भागात भात पिकांचे जास्त क्षेत्र असल्याने भात कापणीला आता वेग आला आहे.