८ वर्षीय मुलीच्या खूनाचे रहस्य उलगडले, चिडवते म्हणून अल्पवयीन शेजाऱ्याने केला खून

मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यादृष्टीने तपास करताना, परिसरातील पंधरा वर्षीय मुलगा अचानक गायब झाल्याची माहिती पेल्हार पोलीसांना मिळाली होती.

    वसई । रविंद्र माने : वसई फाटा येथील बंद खोलीत आढळलेल्या ८ वर्षीय मुलीच्या खूनाचे रहस्य उलगडले असून, ती वारंवार चिडवत असल्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन शेजाऱ्याने तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

    मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या वसई फाटा येथे राहणारी चांदनी साह ही शाळकरी मुलगी १ डिसेंबरला बेपत्ता झाली होती. सायंकाळी शाळेतून घरी परतल्यावर ती आईस्क्रीम आणण्यासाठी साडेपाचच्या सुमारास घराबाहेर गेली होती. ती रात्री परतलीच नाही, त्यामुळे तिच्या वडीलांनी पेल्हार पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. त्या दिवसापासून तिचा पोलीस-पालक आणि शेजारी शोध घेत होते. तिचा शोध घेणाऱ्याला २० हजार रुपयांचे इनामही पालकांनी लावले होते. अखेर ४ तारखेला तिचा मृतदेहच हाती लागला. येथील चाळीतील पाच नंबरच्या रिकाम्या खोलीत मोरीत पाय बांधलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यादृष्टीने तपास करताना, परिसरातील पंधरा वर्षीय मुलगा अचानक गायब झाल्याची माहिती पेल्हार पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीसांनी त्याच्या वडीलांची चौकशी केली असता, या चौकशीत तो उघडा पडला आणि चांदनीच्या हत्येचे गुढ उकलले.

    त्यांच्या अल्पवयीन मुलाने चांदनीचा गळा आवळून खून केला, ही बाब त्याने वडीलांना सांगितली. दोघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट ही लावण्याचे ठरवले होते. मात्र, त्याचवेळी चांदनी गायब झाल्याची बोंब झाली आणि त्यांना चांदनीचा मृतदेह चाळीतील खोली नं.५ मध्येच ठेवावा लागला. चांदनी सदर मुलाला नेहमी चिडवत असे, घटनेच्या सायंकाळी ही तिने त्याला शेंबड्या म्हणून चिडवले होते. त्यामुळे तो तिच्या मागे लागला आणि ती नेमकी त्याच्याच घरात शिरली. तेंव्हा दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळला अशी माहिती त्याच्या वडीलांनी पोलीसांना दिली.

    चांदनीचा शोध घेण्यात येत असताना, सदर मुलगा तिला शोधण्याचा बनाव करीत होता. तसेच आपको किसपे शक है क्या असे तो तिच्या वडीलांनी विचारायचा. या खुन प्रकरणी पोलीसांनी वडिलांना अटक केली असून, सदर अल्पवयींन मारेकरी जालना येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.