जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

दर महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांचे पगार होत असतात. मात्र दिवाळीच्या सणात सुमारे हजार ते बाराशे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

    पालघर : नोव्हेंबर महिन्याची नऊ तारीख उलटून गेल्यावर सुद्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध सवर्गातील कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार अजून पर्यंत झाला नसल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात जाणार आहे.

    पालघरच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक आणि सहायिका आरोग्य सेवक आणि सेविका औषध निर्माण करणारे अधिकारी, अर्धवेळ स्त्री परिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक वाहन चालक आणि शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांचा आणि दिवाळीच्या तोंडात अजून पर्यंत पगार न झाल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असून मुलांना व घरच्यांसाठी दिवाळीनिमित्त नवीन कपडे फटाके व फराळासाठी लागणारे साहित्य घरी घेऊन जाऊ शकत नसल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली.

    दर महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांचे पगार होत असतात. मात्र दिवाळीच्या सणात सुमारे हजार ते बाराशे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. सुट्टीच्या दिवशीही कर्मचारी कर्तव्य तत्परतेने कामावर येतात. त्याचाही मोबदला वेळवर मिळत नाही. सणासुदीचे दिवस असताना पगारही वेळेवर होत नसल्याबद्दल कर्मचारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

    जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पगार होण्यासंबंधीची पूर्तता झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र आज नऊ तारीख उलटून गेल्यावर सुद्धा अजून पर्यंत पगार झाला नाही यासंबंधी त्या विभागातील अधिकाऱ्यांनी यासंबंधी पाठपुरावा करणे अपेक्षित असताना तो झाला नसल्यामुळे पगारास एवढा विलंब झाल्याचे बोलले जात आहे.

    आमच्याकडून पगारासंबंधीची सर्व प्रक्रिया झालेली आहे. हैदराबाद येथे सॉफ्टवेअर मध्ये काही तांत्रिक त्रुटी (टेक्निकल एरर) आल्यामुळे पगारासाठी उशीर होत आहे. उद्यापर्यंत पगार बँकेत जमा होईल असे हैदराबाद येथील कंपनी कडून सांगण्यात आले आहे असे डॉ. संतोष चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.