राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजनासाठी पालघर जिल्हा क्रीडा विभागाच्या पाठीशी – जि.प. अध्यक्ष प्रकाश निकम

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सदावर्तक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले.

    पालघर : राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या बरोबरीने पालघर जिल्ह्यात तीन विविध क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय स्पर्धा या संपन्न झाल्या आहेत. आता यापुढे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पालघर जिल्ह्यात झाली पाहिजे यासाठी क्रीडा अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. संपूर्ण जिल्हा यासाठी आपल्याला मदत करेल असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बोईसर येथे केले.

    सतरा वर्षाखाली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन बोईसर येथील डॉ. स.दा.वर्तक विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी निकम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बोईसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ नंदकुमार वर्तक, अप्पर पोलीस अधीक्षक व अर्जुन अवॉर्ड विजेते पंकज शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, संजय पाटील, पी टी पाटील, प्रभाकर पाटील, नागेश पाटील मुख्याध्यापक डेरेल डिमेलो व मान्यवर उपस्थित होते.

    सतरा वर्षाखाली व्हॉलीबॉल मुले व मुलींची राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच पालघर जिल्ह्यात होत असून यामध्ये लातूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नाशिक या आठ विभागातून मुलांचे व मुलींचे सोळा संघ सहभागी झाले आहेत. संघ जिंकणे हरणे होत असते हार हा देवाला अर्पण करायचा असतो. आपण सामना जरी हरलो तरी खचून न जाता कशामुळे आपण हरलो याचा विचार करून नव्या उमेदीने परत सराव करून पुढच्या प्रतियोगितेसाठी आपण तयार राहिले पाहिजे असे निकम यांनी यावेळी सांगितले.

    मित्रांनो तुमच्यासमोर आज मी अधिकारी म्हणून जो उभा आहे ती लाल मातीची अठरा वर्ष सेवा केली म्हणून मी उभा आहे. मी कुठल्याही प्रकारची परीक्षा देऊन उभा नाही खेळामुळे शासनाने मला सरळ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती केली. तुमच्यापैकी कोणीतरी खेळात करिअर करून तुम्ही अधिकारी होऊ शकतात खेळाडूला जो मान आहे तो कोणालाही नाही. त्याकरिता खेळाडू बना असा आशावाद अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन अवॉर्ड विजेते व आशियाई सुवर्णपदक विजेते पंकज शिरसाट यांनी व्यक्त केला

    स्पर्धेच्या ठिकाणी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित व जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सदावर्तक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले.