पालखी मार्गातील कामे १० तारखेपर्यंत पूर्ण होतील : जिल्हाधिकारी

सासवड येथील पुलाचे कामाला थोडा वेळ लागू शकतो. याठिकाणी थोडे भू संपादन बाकी आहे. मात्र, या पुलावर स्लॅब टाकण्याचे काम १४ तारखेपूर्वी होईल. मात्र, २० तारखेपर्यंत हा पूल वापरात येऊ शकतो.

    नीरा : संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील आपेक्षीत अशी सर्व कामे १० तारखेपूर्वीच पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सासवड येथील कऱ्हा नदीवरील पूलदेखील पालखीपूर्वीच पूर्ण होईल आणि या पुलाचा उपयोग वारकरी यावर्षी करतील, असा विश्वास त्यांनी नीरा येथे पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला.

    पुणे जिल्ह्यातील हडपसर ते नीरा दरम्यानच्या सासवड, जेजुरी, वाल्हे, पिंपरे खुर्द व नीरा येथील पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केली. यानंतर पिंपरे येथील शासकीय विश्रमगृहात ते थांबले असताना पालखी मार्गातील अडथळ्याबाबत व अपुऱ्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली व अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.

    यावेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, नॅशनल हायवेचे अनिल गोरड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

    वाल्हे येथील रेल्वेचे काम मार्गी लागणार

    यावेळी देशमुख म्हणाले, सासवड येथील पुलाचे कामाला थोडा वेळ लागू शकतो. याठिकाणी थोडे भू संपादन बाकी आहे. मात्र, या पुलावर स्लॅब टाकण्याचे काम १४ तारखेपूर्वी होईल. मात्र, २० तारखेपर्यंत हा पूल वापरात येऊ शकतो. वाल्हे येथील रेल्वेच्या कामाबद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. तेही काम मार्गी लागणार आहे. एकंदरीतच पालखी सोहळ्यात कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, त्या आम्ही दाखवल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी सबंधित विभागाला त्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने सासवडचा पूल, रेल्वेचे काम आणि पिसुर्टी येथील अरूंद रस्ता याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहे.  त्यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा पाहणी करणार आहोत.

    – ॲड. विकार ढगे, पालखी सोहळाप्रमुख.