आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज; केली ‘अशी’ तयारी…

आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी (Arvind Mali) यांनी दिली.

    पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत (Ashadhi Wari 2022) पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी (Arvind Mali) यांनी दिली.

    गेल्या महिनाभरापासून प्रशासनामार्फत शहरातील 65 एकर तसेच वाखरी येथील शौचालयांच्या दुरुस्त्या, इतर स्वच्छता करण्याचे काम सुरू असून, वाळवंटामधून जवळपास 50 टन कचरा काढण्यात आला आहे. घाटावर साफसफाई करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत करण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

    तसेच महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या अनुषंगाने नदी पात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखी तळ, 65 एकर व शहरातील सर्व सुलभ इंटरनॅशनल शौचालयमध्ये सॅनिटरी नॅपकिन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरिन टेस्ट केली जाणार आहे.

    आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट, 65 एकर परिसर, पत्रा शेड, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1350 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये 350 कायम तर 1000 हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत.