
कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील पन्हाळ्यावर येताना डावीकडे असणाऱ्या मोठ्या दगडी शिळा सकाळी अकरा वाजता कोसळल्याने खबरदारी म्हणून सोमवारी दुपार पर्यंत पन्हाळ्यावर येणारी वाहतूक बुधवारपेठेपासून बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे हि घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पन्हाळा : कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील पन्हाळ्यावर येताना डावीकडे असणाऱ्या मोठ्या दगडी शिळा सकाळी अकरा वाजता कोसळल्याने खबरदारी म्हणून सोमवारी दुपार पर्यंत पन्हाळ्यावर येणारी वाहतूक बुधवारपेठेपासून बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे हि घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील दगडी शिळा बाजुला करण्याचा प्रयत्न केला तथापी ते शक्य झाले नाही. या ठिकाणी नायब तहसीलदार संजय वळवी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमोल कोळी यांनी सर्वेक्षण करून रस्त्यावर पडलेले दगड हटवून वाहतूक खुली केली. उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी आणखीन दगडी शिळा कोसळणार नाहीत, याची खात्री करा, अशी सुचना करत भुगर्भ विभागाकडून तपासणी करून घेतली जाईल, असे सांगितले.
सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने कार्यालयात येणारे लोक नसल्याने मोठा अनर्थ टळला असला तरीही पन्हाळ्यावर येताना पावसाळ्यात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी केले.
एक महिना काम रखडले
पन्हाळ्यावर येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराची जमीन वनविभागाच्या हद्दीतील येते, पण वनविभाग कोणतीही जबाबदारी घेत नाही. सोमवारी पडलेल्या दगडी शिळांची त्यांनी दखलही घेतली नाही. अधिकाऱ्यांनी भेटही दिली नाही, पण २०२१ च्या रस्ता दुरुस्ती वेळी परवानगीसाठी एक महिना काम रखडवले होते.