नान्नजमध्ये सहा बॉम्बच्या अफवेने घबराट ; पोलीसांची धावपळ;बॉम्ब शोधक पथकाने केली पाहणी

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये ६ बॉम्ब ठेवले असल्याची खबर मुंबई येथील पोलीस कंट्रोलला मिळाली, तातडीने तपास यंत्रणांनी बॉम्बशोधक पथकासह नान्नज गाठले मात्र तपासाअंती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

    जामखेड: जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये ६ बॉम्ब ठेवले असल्याची खबर मुंबई येथील पोलीस कंट्रोलला मिळाली, तातडीने तपास यंत्रणांनी बॉम्बशोधक पथकासह नान्नज गाठले मात्र तपासाअंती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काल रविवारी दिवसभर बॉम्बच्या चर्चेने नान्नज गाव पुर्ण भितीच्या दहशती खाली होते. ही अफवा दिनेश सुतार या व्यक्तीने पसवली होती. आता पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

    सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकल या दुकानात बॉम्ब ठेवल्याची खबर मुंबई कंट्रोलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून रविवारी (दि. १८ ) सकाळी दहा वाजता मिळाल्यानंतर जामखेड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू थोरात, सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी भोस, पोलिस कॉन्स्टेबल आबा आवारे, सतीश दळवी, नवनाथ शेकडे हे फौजफाट्यासह बालाजी मेडिकलजवळ सकाळी दहा वाजता दाखल झाले. जामखेड पोलिसांनी दिवसभर बालाजी मेडिकलसह परिसराची तपासणी करून तेथे लक्ष केंद्रित केले.

    सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास नगर येथील बॉम्बशोधक पथक व निकामी करणाऱ्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मुरकुळे, हवालदार एस.सी. येटेकर, पोलिस नाईक सतीश तवार, उमेश मोरे, दिनेश पळलकर, अंकुश कुलांगे, कॉन्स्टेबल गौरव भिंगारदिवे, देविदास शेंडे, रोहित कांवळे, अरुण गायकवाड, गडदे आदी नान्नजमध्ये दाखल झाले.
    पोलीस फौजफाटा येताच नागरिकांची कुजबुज सुरू झाली. मेडिकलसह संपूर्ण परिसराची या पथकाने तपासणी केली. डॉग स्क्वॉडमधील जंजीर या श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला.

    मात्र पथकास बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गावातील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. यावेळी मेडिकल परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.