सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगवर पंकजा मुंडेंनी मांडलं मत , म्हणाल्या…

आत्ताचं युद्ध सोशल मीडियावर (Social Media War) लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे.

    भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Mumnde) यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीवरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यानंतर खुद्द पंकजा मुंडेंनीही त्यावर स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं होतं. बीडमधील (Beed) त्यांच्या या विधानानंतर आता अजून एका उपहासात्मक विधानाची चर्चा आहे. बीडच्या एका कार्यक्रमात सोशल मीडियावरून सुरु असलेल्या वॉरवर (Social Media War) पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

    बीडच्या परळी शहरात संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीच्या निमित्ताने सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांनी बुधवारी संध्याकाळी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

    पंकजा मुंडे म्हणाल्या की,“जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या (गोपीनाथ मुंडे) वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो”.

    “मी राजकारणात असेन. परळीची नाही, समजा राज्यातील अनेक लोकांची नेताही असेन. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मी किनाऱ्यावर बसून काम करण्यापेक्षा मैदानात उतरून किंवा समुद्राच्या वादळात उतरून आपली नौका पार लावण्याकडे माझा कल जास्त आहे. आणि तेच कायम राहणार आहे”, असंही त्या म्हणाल्या.

    त्या पुढे म्हणाल्या की,“काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली. हे एक तीर में दो निशाण आहे”, अशी कोपरखळी पंकजा मुंडेंनी मारली! त्यांचं हे विधान ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला!