‘भाजपमध्ये पंकजा मुंडेंचा छळ, त्या सध्या संभ्रमावस्थेत’; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी मीच मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत येऊ शकले. पण त्यांनी व्यक्तिगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली. हे मला योग्य वाटत नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केली आहे.

    जळगाव : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी मीच मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत येऊ शकले. पण त्यांनी व्यक्तिगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली. हे मला योग्य वाटत नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्याप्रमाणे आता भाजपमध्ये पंकजा मुंडेंचासुद्धा छळ सुरू आहे. त्या सध्या संभ्रमावस्थेत आहे’, असेही खडसे म्हणाले.

    फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात आहे. 2014 पूर्वी विधानसभेत मी जिथे बसायचो, त्याच्या पाठीमागील जागा मी फडणवीसांना दिली होती. विरोधी पक्षनेते असताना माझ्याऐवजी बोलण्याची संधी फडणवीसांना दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उचलले. त्यांचे कौशल्यही त्यात होते. नंतरच्या कालखंडात फडणवीसांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. पण, सूडाचे राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही. पक्ष सोडण्यासाठी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा खडसे यांनी केला.

    आता तावडे सावरले

    विनोद तावडे सावरले आहे. ते महाराष्ट्रातून दिल्लीला गेले. पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहे. म्हणून त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतला नाही. मी निर्णय घेऊन वेगळी दिशा आणि मार्ग अवलंबला. पंकजा यांना काही सल्ला देऊ अशी स्थिती नाही. त्या परिपक्व आहे. त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्या निर्णय घेतील.

    – एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी.