धनगर आरक्षणासाठी पनवेल तालुक्यातील युवकाने केली आत्महत्या

गावातील ग्रामस्थानांमध्ये धनगर आरक्षणासाठी सदर तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. तशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी देखील समोर आली आहे.

    पनवेल ग्रामीण : मराठा आरक्षणासाठी एका युवकांने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता धनगर आरक्षणा साठी एका ३८ वर्षीय युवकांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दिनांक २२ ऑक्टोबर रोजी घडली आहे. बिरूदेव वसंत खर्जे असे आत्महत्या केलेल्या युवकांचे नांव आहे. मागील अनेक वर्षा पासून ते पनवेल तालुक्यातील कळंबोली वसाहतीत परिवारा सोबत वास्तव्याला होते. मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील रहिवाशी असलेल्या बिरूदेव खर्जे यांनी गावी जाऊन शेतातल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.

    गावातील ग्रामस्थानांमध्ये धनगर आरक्षणासाठी सदर तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. तशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी देखील समोर आली आहे. दरम्यान या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या आरेवाडी येथे धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत असताना दुसऱ्या बाजूला बिरुदेव खर्जे या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरू झालंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.