रायरेश्वरावरून मशाल घेऊन शिव सैनिक निघाले शिवतीर्थाकडे

पुणे जिल्यातील भोर तालुक्यातील शिव सैनिक देखील ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरातून मशाल घेऊन पायी मेळाव्या स्थळी निघाले आहेत.

    पनवेल – ग्रामीण : शिव सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा दसरा मेळावा मंगळवारी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्या साठी राज्य भरातून उबाठा गटाचे शिव सैनिक उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्यातील भोर तालुक्यातील शिव सैनिक देखील ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरातून मशाल घेऊन पायी मेळाव्या स्थळी निघाले आहेत. वीर बाजी बांदल, महारुद्र बाजी प्रभू देशपांडे प्रतिष्ठान भोर या संघटनेच्या वतीने शिव तीर्थाकडे निघालेल्या शिव सैनिकांमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास बांदल यांच्या सोबत ११ शिव सैनिक सामील असून, कविता साळवे या महिला शिव सैनिकाचा देखील या चमूत समावेश आहे.

    या वेळी बोलताना ज्याप्रमाणे बांदल घराणे प्रतापगडाच्या वेढ्यातून निसटताना शिवाजी महाराजांसोबत होते त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे अडचणीत असताना त्यांच्यासोबत उभे राहण्यासाठीच आम्ही देखील मशाल घेऊन शिव तीर्थावर हजर राहणार असल्याचे मत प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विकास बांदल यांनी व्यक्त केले आहे. दसरा मेळाव्या करिता भोर तालुक्यातून मशाल घेऊन जाण्याचे प्रतिष्ठानचे हे दुसरे वर्ष असून, रायरेश्वर मंदिरातून रविवारी २२ ऑक्टोबर रोजी निघालेले हे शिव सैनिक सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी पनवेल मध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्या प्रसंगी हे शिव सैनिक मेळावा स्थळी दाखल होणार आहेत.