सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री, देशमुखांकडून दबाव; परमबीर सिंग यांची विशेष सीबीआय न्यायालयात माहिती

वाझेने नोंदवलेल्या जबानीत देशमुखांनी वाझेला बार आणि रेस्टाँरंटकडून खंडणी गोळा कऱण्यास सांगितली होती. केली. मात्र, ४.७० कोटी खंडणी गोळा केल्यानंतर ती कमी असल्याबद्दल देशमुखांनी रागही व्यक्त केला होता. अशी माहितीही त्यांनी दिली.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गैरकृत्यांची आणि गैरव्यवहारांची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhhava Thackeray) आणि अन्य काही मोठ्या नेत्यांना दिली होती. मुख्यमंत्री आणि देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेला (Sachin Vaze) पुन्हा सेवेत रुजू करण्याचा आपाल्यावर दबाव आणला असल्याचा आरोपही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपल्या जबाबात सोमवारी केला.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. यामध्ये देशमुखांसह त्यांचे दोन स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक कऱण्यात आली होती. न्यायालयाच्या परवानगीने त्यांची सीबीआयकडून चौकशीही करण्यात आली. चारही आरोपीविरोधात विशेष सीबीआय न्यायालयात सीबीआयकडून नुकतेच आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. त्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतली आहे. याप्रकऱणी आरोपी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार झाला आहे.

    याप्रकऱणी सिंग यांनी जबाब नोंदवला आहे. मार्च २०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) अनेकवेळा भेटलो आणि त्याआधीही मी त्यांना गृहमंत्री देशमुखांच्या गैरकृत्यांची माहिती दिली होती, असे सिंह यांनी जबाबात म्हटले आहे. ४ ते १५ मार्च २०२१ दरम्यान वर्षा येथे एक बैठक झाली, ज्यामध्ये मी त्यांना गृहमंत्र्यांच्या कृतींबद्दल माहिती दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी फक्त ते (देशमुख) माझे गृहमंत्री असल्याचे सांगितले. तसेच मार्च २०२१ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या गैरकृत्यांची माहिती दिली होती. त्यासोबतच देशमुखांच्या गैरकारभाराबाबत अजित पवार, अनिल परब आणि जयंत पाटील यांच्याकडेही बाजू मांडली होती. त्यांना माहिती देऊनही कोणीही याबाबत एक शब्दही काढला नाही,त्यामुळे त्यांना देशमुखांबाबत आधीच माहिती होती, अशी शंकाही सिंग यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यामुळे आपण त्यांच्यावर असे आऱोप करत असल्याचा त्यांचा दावा चुकीचा आहे. मी त्याआधीच मुख्यमंत्री आणि शऱद पवार यांना देशमुखांच्या गैरकृत्यांची माहिती दिली. त्याचा सूड घेण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी माझ्यावर अँटिलीया स्फोटक प्रकऱणाचे आरोप कऱण्यात आले असेही परमबीर यांनी स्पष्ट केले.

    आदित्य ठाकरे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुरा चौहान यांनी माझी भेट घेतली आणि वाझेला पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सागितले. जेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता मुख्यमंत्री आणि देशमुखांनी वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. असा आरोपही परमबीर यांनी केला.

    तर सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वाझेने नोंदवलेल्या जबानीत देशमुखांनी वाझेला बार आणि रेस्टाँरंटकडून खंडणी गोळा कऱण्यास सांगितली होती. केली. मात्र, ४.७० कोटी खंडणी गोळा केल्यानंतर ती कमी असल्याबद्दल देशमुखांनी रागही व्यक्त केला होता. देशमुखांच्या म्हणण्यानुसार, १७५० बार असून त्या प्रत्येकाकडून ३ लाख रुपये जमा केल्यास ४० ते ५० कोटी जमा होणे अपेक्षित आहे, असेही देशमुखांनी आपल्याला सांगितल्याचे वाझेने सीबीआयला सांगितले.