धक्कादायक – ऐकीव माहितीवरून देशमुखांवर वसुलीचे आरोप, परमबीर सिंह यांचा चौकशी आयोगासमोर घुमजाव!; परमबीर सिहांच्या साक्षीला अर्थ नसल्याचा वकिलांचा दावा

सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळवल्यानंतर परमबीरसिंह यांच्या वकिलांनी राज्य सरकारने गठीत केलेल्या न्या. चांदिवाल चौकशी(Chandiwal Commission) आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यासंबंधी आरोपांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

  मुंबई: देशभरातील तपास यंत्रणा ज्यांचा शोध घेत आहेत ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांनी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळवल्यानंतर परमबीरसिंह यांच्या वकिलांनी राज्य सरकारने गठीत केलेल्या न्या. चांदिवाल चौकशी(Chandiwal Commission) आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यासंबंधी आरोपांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप ऐकीव माहितीवर असल्याचे तसेच त्यामुळे त्याकरीता कोणताही पुरावा नसल्याने परमबीर सिंह यांना साक्षीदार म्हणून उभे करण्यातही काहीच अर्थ नसल्याचा खुलासा केला आहे.

  परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत महाराष्ट्र सरकराने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी आयोग गठीत केला आहे. निवृत्ती न्यायाधीश के यू चांदीवाल या समितीत आहेत. वकील अभिनव चंद्रचूड परमबीर सिंह यांची बाजू मांडत असून त्यांनी या चौकशी आयोगासमोर ही माहिती दिली.

  पत्रावर मात्र ठाम
  यावेळी त्यांनी परमबीर सिंह साक्षीदार म्हणून समोर येण्यास इच्छुक नाहीत असे सांगताना आपल्या पत्रावर मात्र ते ठाम असून त्यासंबंधी येत्या काही आठवड्यात प्रतिज्ञातपत्र दाखल करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती दिली. मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असून सध्या ते ईडीच्या कारवाईसाठी न्यायालयीन कोठडीत आहेत.

  मुंबई पोलीसांकडून जीवाला धोका
  दरम्यान परमबीर सिंह यांच्याविरोधात महाराष्ट्रात फौजदारी गुन्हे दाखल असून ते गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. आपल्याला मुंबई पोलीस केव्हाही अटक करू शकतात, त्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे, अशी भीती व्यक्त करीत परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे.