आई-वडिलांनी किडनी देऊन आपल्या मुलांना दिला पुनर्जन्म…!

एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेड्यात वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे 18 वर्षीय महेशचे (नाव बदलले आहे) आई-वडील ! आणि दुसरीकडे अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात ऊसतोड मजूर म्हणून राबून, कुटुंबाचे पोट भरणारे 23 वर्षीय नितीनचे (नाव बदलले आहे) वडील !

    कराड : एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेड्यात वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे 18 वर्षीय महेशचे (नाव बदलले आहे) आई-वडील ! आणि दुसरीकडे अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात ऊसतोड मजूर म्हणून राबून, कुटुंबाचे पोट भरणारे 23 वर्षीय नितीनचे (नाव बदलले आहे) वडील ! किडनी विकाराने त्रस्त झालेल्या या दोघांवर गेल्या 6 महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील एका दवाखान्यात डायलेसिस उपचार सुरु होते. तिथे या कुटुंबांची एकमेकांशी ओळख झाली. दोन्ही कुटुंबांना एकच चिंता सतावत होती, ती म्हणजे आपल्या मुलांना या संकटातून बाहेर काढायचे कसे? यासाठी समोर पर्यायही एकच होता; तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लान्टचा ! पण हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबांना खर्च परवडणारा नव्हता.

    त्याचवेळी त्यांना कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेबद्दल माहिती समजते. ही दोन्ही कुटुंबे तडक तिकडून निघून येतात आणि आगाशिवनगरात एका खोलीत भाड्याने तब्बल ३ महिने राहून, कृष्णा हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी व उपचार घेऊ लागतात. महेशसाठी त्याची आई आणि नितीनसाठी त्याचे वडील पुढे येत, आपली एक किडनी आपापल्या मुलांना देतात आणि आपल्या मुलांना या संकटातून बाहेर काढत पुनर्जन्म देतात..!

    एखाद्या चित्रपटाची हृदयद्रावक कथा वाटावी, अशी ही सत्यघटना कृष्णा हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली आहे. किडनी दान करणारे आई आणि वडील; तसेच ज्यांना किडनी प्रत्यारोपण करण्यात आले त्या दोन्ही रुग्णांना नुकताच कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, चौघेही सुखरुप आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या महेशचे वडील उदरनिर्वाहासाठी गावातच वडापावचा गाडा चालवितात. महेशला लहानपणापासूनच किडनीचा विकार जडलेला होता. गेली कित्येक वर्षे हे कुटुंब अनेक हालअपेष्टा सहन करत, त्याच्या उपचारांसाठी धडपडत होते.

    काहीही करुन आपल्या मुलाला या संकटातून बाहेर काढायचेच असा चंग या कुटुंबाने बांधला होता. पण गेल्या ६ महिन्यांपूर्वी महेशचे हे दुखणे बळावले आणि डॉक्टरांनी नियमित डायलेसिस करण्याची सूचना केली. किशोरवयीन महेश सततच्या डायलेसिस प्रक्रियेला कंटाळला होता; तर त्यासाठी येणाऱ्या खर्चामुळे आई-वडील हवालदिल झाले होते. शिवाय रोजची रोटी कमाविल्याशिवाय घरची चूल पेटत नसल्याने उपचारासाठी वेळ देणेही दिवसेंदिवस कठीण बनत चालले होते.