अंधश्रद्धेच्या आहारी जात जन्मदात्यांनीच मुलीसोबत केलं असं काही की….

मागील काही दिवसांपासून तिच्या हावभावात बदल दिसून आल्यामुळे भोंदूबाबाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानंतर तिला परवा रात्री जबर मारहाण करण्यात आली होती.

    नागपूर : अंधश्रद्धेच भूत एखाद्याच्या मनगुटीवर बसलं की ते त्याच्याकडून काय काय करून घेईल याची कल्पनाही कुणी करु शकत नाही. असं म्हणण्याचं कारण म्हणजे नागपुरात अंद्धश्रद्धेच्या आहारी जात आईवडिलांनी त्यांच्या अवघ्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या (Nagpur Murder) केली आहे.

    नागपूरच्या सुभाषनगर भागात ही संतापजनक घटना घटना घडली आहे. भूतबाधा झाल्याच्या संशयातून एका भोंदूबाबाने दिलेल्या सल्ल्यानुसार एका दाम्पत्यानं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईवडिलांना अटक केली आहे.

    मिळालेली माहिती अशी की,  मागील काही दिवसांपासून तिच्या हावभावात बदल दिसून आल्यामुळे भोंदूबाबाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानंतर तिला परवा रात्री जबर मारहाण करण्यात आली होती. लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारल्यामुळे चिमुकलीला मार सहन न झाल्यामुळे ती निपचित पडली होती. त्यानंतर आईवडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनंतर पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी असलेल्या आईवडिलांना आणि तिच्या मावशीला ताब्यात घेत अटक केली आहे. त्यानंतर सल्ला देणाऱ्या भोंदूबाबाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.