पारनेरचे आमदार लंके यांचा अखेर राजीनामा

गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी बिनसल्यानंतर आ. लंके यांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली.

    अहमदनगर : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून शरद पवार यांच्या गटात उडी मारणारे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी अखेर राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. कार्यकर्त्याच्या मेळाव्यात त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात आ. लंके यांना पाठिंबा दर्शविला. मात्र हे करताना मेळाव्यात आ. लंके आणि कार्यकर्त्यांनी अश्रूंना वाट रिकामी करून दिली.

    गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी बिनसल्यानंतर आ. लंके यांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. गेली तीन वर्षे खा. विखे विरूद्ध आ. लंके असा सामना सातत्याने दिसून आला. त्यावेळी राष्ट्रवादी एक होती. पवार घराण्याचे विखे घराण्याशी असलेले राजकीय वैर लक्षात घेता दोन्ही पवारांकडून आ. लंके यांना बळ मिळत गेले. त्यामुळे आ. लंके यांची संघर्षाची धार आणखी तीव्र झाली. दरम्यानच्या काळात अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. आ. लंके यांनीही शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात उडी मारली. महायुतीचा धर्म म्हणून खा. विखे आणि आ. लंके यांना आपसातील वाद मिटविणे अत्यावश्यक होते. काही दिवस शांततेत गेल्यानंतर हा संघर्ष पुन्हा पेटला.

    राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वी आ. लंके यांना लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून प्रोजेक्ट केले जात होते. राष्ट्रवादी फुटीनंतर याला खीळ बसली असली तरी आ. लंके यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची जिद्द वेळोवेळी दिसून आली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आ. लंके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत भेटीगाठी वाढविल्या. त्यामुळे ‘आ. लंके जर वेगळा निर्णय घेणार असतील तर त्यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल’ अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आ. लंके द्विधा मनस्थितीत होते. यावर पर्याय म्हणून त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य असलेली पत्नी राणी लंके यांचे नाव लोकसभेसाठी पुढे करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यास मान्यता दिली नसल्याचे समजते. त्यामुळे आता तेच स्वतः रिंगणात उतरणार आहेत. कायदेशीर कचाट्यात अडकवण्याऐवजी विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

    आ. लंके यांनी आपल्या भाषणात मंत्री राधाकृष्ण विखे व खा. सुजय विखे यांच्यावर टीका केली. लोकसभा माझ्यासाठी नाहीतर सर्वसामान्य लोकांसाठी लढवायची आहे. मला मतदान करण्यासाठी ग्रामपंचायतचे ठराव करावेत. ही पारनेरच्या अस्मितेची लढाई आहे. शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे मी लढणारच. लोकांनी मला विधानसभेत पाच वर्षांसाठी निवडून दिले होते, पण सहा महिने अगोदर राजीनामा द्यावा लागत आहे. त्यामुळे जनतेची मी माफी मागतो. मी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवत आहे, असे आ. लंके यांनी जाहीर केले.