पर्वती पोलिसांनी लावला साडेतीन वर्षांपूर्वीच्या खूनाचा छडा; आरोपीला बेड्या; पर्वती टेकडीवर आढळला होता मृतदेह

  पुणे : पर्वती पोलिसांनी तबल साडेतीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका खुनाच्या घटनेचा यशस्वीरित्या छडा लावला आहे. साडेतीन वर्षांपूर्वी म्हणजेच ऐन कोरोना काळात पर्वती टेकडीवर पडक्या पाण्याच्या टाकीजवळ एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेची ओळखदेखील पटली नव्हती. तसेच, तिच्या मृत्यूचे कारण पोलिसांना समजले नव्हते. मात्र, पुणे पोलिसांनी आता बेसिक पोलिसिंगच्या माध्यमातून अखेर या खुनाचे रहस्य उलगडले आहे. खुनाचा हा प्रकार १७ ऑगस्ट २०२० रोजी उघडकीस आला होता.

  खून झालेल्या महिलेचे नाव

  सुरेखा संतोष चव्हाण (वय 36, रा. शिवापूरवाडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर दादाहरी साठे (२६) याला अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अनिस तांबोळी व त्यांच्या पथकाने केली.

  कोरोना काळात घडलेल्या गुन्ह्याची उकल

  कोरोना काळ तसा भयंकर होता. कोणी कोणाला बोलतही नसत. बाहेर पडणही भीतिदायक होत. मात्र अश्यातच मॉर्निंग वॉकमुळे सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी होत असताना कुजलेल्या अवस्थेत एक ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा आल्याचे दिसून आले. पाहणीत त्यावर अळ्या लागल्या होत्या. मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हाच नोंद न करता तो शवविच्छेदन करण्यासाठी म्हणून पाठवला. त्यानंतर सलग ३ वर्षांहून अधिक काळ तो दाखल झाला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जयराम पायगुडे यांनी यात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. पर्वती पोलिसांनी अनेक प्रयत्न करून अखेर शेवट या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
  ——अन् असा लागला खुन्याचा शोध…
  पर्वती पोलिसांच्या पथकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड बारकाईन तपासले. प्रत्येक शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिसिंग रेकॉर्ड तपासले. पोलिसांकडे असलेल्या वर्णनाची महिला १२ ऑगस्ट २०२० रोजी घरातून निघून गेली व ती परत आली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रोहन संतोष चव्हाण या तरुणाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने मिसिंग महिला ही सुरेखा ही साडेतीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्याबाबत राजगड पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असल्याचे समजले.
  हातावर “सुरेखा” नाव अन् आरोपीला बेड्या…
  खुनासारख्या गुन्ह्यात मयताची ओळख पटणे खूप गरजेचे असते. त्यानंतरच आरोपींना पकडण्यासाठी यशस्वी प्रयत्न होतात. पर्वती पोलिसांनी साडेतीन वर्षांपूर्वी मयत झालेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची पाहणी केली. तेव्हा हातावर “सुरेखा” असे नाव गोंदलेले होते. त्या एका अक्षरावरून पोलिसांनी प्रथम या महिलेची ओळख पटवली आणि त्यानंतर धागेदोरे शोधत आरोपीला बेड्या ठोकल्या.