अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी अमोल हिंदुराव धायगुडे (वय 23 रा. शेखमिरवाडी ता. खंडाळा) याला पोक्सोअंतर्गत तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांनी हे आदेश बुधवारी दिले.

    सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी अमोल हिंदुराव धायगुडे (वय 23 रा. शेखमिरवाडी ता. खंडाळा) याला पोक्सोअंतर्गत तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांनी हे आदेश बुधवारी दिले.

    आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी तीन हजार रुपये दंड व तो न दिल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली गेली. या खटल्याची माहिती अशी की, आरोपी धायगुडे याने 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी आठ वाजता तामखडा नावाच्या शिवारात माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत विनयभंग केला. पीडित मुलगी घरी घाबरून गेली असता तो तिच्या घराचा दरवाजा वाजवत राहिला. 2 डिसेंबरला आरोपीने अल्पवयीन मुलीच्या समक्ष लज्जास्पद वर्तन केले.

    पीडितेच्या फिर्यादीनुसार, शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक एस. व्ही. पाटील यांनी केला. पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सपोनि सतीश पवार यांनी या प्रकरणी विशेष सहकार्य करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

    ऍड. नितीन मुके यांनी सरकारच्या वतीने खटल्याचे काम पाहिले. या प्रकरणी तीन साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. के. पटणी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 12 नुसार आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली