सांगलीत अघोरी प्रकार! स्मशानभूमीत काळ्या कापडात बाहुल्यांसोबत आढळले मुलींचे फोटो

मांत्रिकाच्या मदतीने वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ,लिंबू,काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो लावून धारदार दाभन खुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे.

    इस्लामपूर : मांत्रिकाच्या मदतीने वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ,लिंबू,काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो लावून धारदार दाभन खुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. होळी पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणाऱ्या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता. आज बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला.

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी. आर. जाधव, निवृत्त प्राचार्य सुदाम माने,विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणल्यावर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली. कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत म्हणाले, ” या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळापर्यत तपास करू. कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करू.”असे आश्वासन पोलिसांनी दिले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या बाहुल्या व इतर साहित्य काढले.आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कापड सोडल्यावर त्यातून नारळ, त्यावर काळी बाहुली,लिंबु व मुलींचे रंगीत फोटोला टोकदार दाभनातून नारळात खुपसले होते. तर नारळाला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी चिठ्या खुपसल्या होत्या. त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचे नाव लिहले आहे. अशी पाच गाठोडी आहेत. यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो व नावे आहेत. एका कागदावर एका मुलाचे नाव आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता केली. वाळवा तालुक्यातील चिकूर्डे सारख्या सदन गावात हा रस्त्यालगत असणाऱ्या स्मशानभूमीत प्रकार घडल्याने गावात दहशत निर्माण झाली होती.
    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनोद मोहिते म्हणाले,”या प्रकारातील फोटो पाहता सोशल मीडियावर असणारे फोटो घेऊन रंगीत झेरॉक्स काढण्यात आल्या आहेत असे वाटते. आपल्या मुली सोशल मीडियावर फोटो टाकतात त्याचा दुरूपयोग होतो याबाबतीत पालकांनी काळजी घ्यावी” असे आवाहन त्यांनी केले.