
सासवड/एखतपूर : दुर्वांकुर संस्थेकडून ऊस तोडणी मजुरांच्या आणि वीटभट्टी मजुरांच्या समवेत एक आगळी-वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. एक दिवाळी ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबासमवेत व वीटभट्टी मजुरांच्या कुटुंबासमवेत साजरी करण्यात आली. दिवाळी फराळ देऊन मायेची दिवाळी साजरी करण्यात आली. सासवड कुंभारवळण येथील पालावरच्या ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबांना भेट दिली असता संस्थेच्या अध्यक्षा अर्चनाताई म्हस्के यांनी त्यांच्या अनेक अडचणी ऐकून घेतल्या. बाहेर राज्यातून कामासाठी इतर राज्यात जेव्हा आम्ही जातो तेव्हा तेथे येणाऱ्या भाषेच्या अडचणींमुळे खूपच त्रास होतो. त्यांना त्यांच्या मनातील काही प्रश्नसुद्धा समोरच्या व्यक्तीकडे भाषेच्या अडचणींमुळे मांडता येत नाहीत.
लेकरांना मायेचा गोड घास भरवण्याचा छोटासा प्रयत्न
ऊसतोड कामगारांबरोबरच वीटभट्टी कामगारांचीदेखील हीच अडचण आहे. ही भारतातल्या कोट्यवधी असंघटित मजुरांची कहाणी आहे. जे आपल्या कुटुंबातील लोकांचे पोट भरण्यासाठी, आर्थिक अडचणीत सापडल्याने ही कामे करतात. या लोकांच्या दैनंदिन जीवनात आनंदाचे काही क्षण व लेकरांना मायेचा गोड घास भरवण्याचा छोटासा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक धीवार, पूजा दीपक धीवार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, L.I.C.H.F.Lच्या वरिष्ठ सहकारी सीमा हिरवे, यश धीवार, श्रीकांत हिरवे, तेजस म्हस्के व संस्थेचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मा.लक्ष्मण म्हस्के व दर्शन धीवार यांनी केले.