थकीत वीज बिलासाठी कनेक्शन तोडल्याने आत्महत्येचा प्रयत्न करून वीज ग्राहकाने महावितरणलाच दिला ४२० व्होल्टेजचा शॉक

महावितरणने वीज कनेक्शन तोडल्यामुळे हवालदिल झालेल्या संभाजीनगर येथील वीज ग्राहकाने वीज जोडणी पूर्ववत व्हावी म्हणून कार्यालय गाठले.मात्र अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत वीज बिल भरल्याशिवाय वीज कनेक्शन जोडता येणार नाही असे ठणकावल्याने या ग्राहकाने चक्क सुभाष रोड येथील महावितरणच्या वीज बिल केंद्राच्या विभागीय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन वीज जोडणी पूर्ववत करा अन्यथा खाली उडी मारतो असा इशारा दिला.

  कोल्हापूर : वीजबिल न भरल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडले- मात्र विजग्राहकाने चौथ्या मजल्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने महावितरणलाच ४२० व्होल्टेज चा शॉक लागल्याने आज कोल्हापुरात सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू होती.ही घटना महावितरण कंपनीच्या सुभाष रोड येथील विभागीय कार्यालयात घडली.

  लॉक डाऊन च्या काळातील वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.मात्र वीज ग्राहकांनी कोट्यवधी रुपयांची वीज थकबाकी न भरल्याने अडचणीत आलेल्या महावितरण कंपनीने आता थकीत वीजबिलासाठी थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडायला सुरू केले आहे.मात्र कोल्हापुरात वीज कनेक्शन तोडणीच्या कारवाईमुळे आज महावितरण कंपनीलाच ४२० व्होल्टेजचा ‘शॉक’बसला.

  महावितरणने वीज कनेक्शन तोडल्यामुळे हवालदिल झालेल्या संभाजीनगर येथील वीज ग्राहकाने वीज जोडणी पूर्ववत व्हावी म्हणून कार्यालय गाठले.मात्र अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत वीज बिल भरल्याशिवाय वीज कनेक्शन जोडता येणार नाही असे ठणकावल्याने या ग्राहकाने चक्क सुभाष रोड येथील महावितरणच्या वीज बिल केंद्राच्या विभागीय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन वीज जोडणी पूर्ववत करा अन्यथा खाली उडी मारतो असा इशारा दिला आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भीतीने गाळण उडाली.तात्काळ अग्निशमल दल, पोलिसाना पाचारण करण्यात आले.हातापाया पडून या ग्राहकाची समजूत काढून त्याच्या घरातील वीज जोडणी महावितरणने पुन्हा केली.जवळपास दीड तास सुरू असलेल्या या ‘शोले’स्टाइल नाट्यक्रमामूळे सरकारी यंत्रणेची मात्र चांगलीच दमछाक झाली.

  संबंधित वीज ग्राहक हा रिक्षा व्यावसायिक आहे. केवळ ४ हजार पाचशे रुपये थकल्याने महावितरण कंपनीने त्याच्या घरातील वीज कनेक्शन तोडले.वीज खंडित केल्याचे समजताच संबंधित वीज ग्राहक थेट महावितरणच्या कार्यालयात पोहचला.

  शनिवार असल्यामुळे कार्यालयात दुपारनंतर शुकशुकाट होता. रागाच्या भरात त्या रिक्षा व्यावसायिकाने इमारतीचा चौथा मजला गाठला. आणि चौथ्या मजल्यावरुन ‘माझी नोकरी गेली आहे, रिक्षा व्यवसायातून फार उत्पन्न नाही.बिल भरण्यासाठी पैसे कोठून आणू, महावितरण कंपनीने सवलत द्यायला हवी.अशा शब्दांत गाऱ्हाणी मांडायला सुरुवात केली. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा प्रकार समजला. ते ही घटनास्थळी धावले. अग्निशमन दलाचे जवानही तत्काळ घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. मात्र वीज जोडणीच्या मुद्यावर रिक्षा व्यावसायिक ठाम राहिल्याने अखेर
  पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. त्या रिक्षा व्यावसायिकाची समजूत काढली. ‘महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घरी वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. घरी फोन करुन माहिती घ्या’असे सांगितले. दरम्यानच्या काळात महावितरणने वीज जोडणी केली होती. घरी पुन्हा वीज पुरवठा सुरू असल्याचे समजताच रिक्षा व्यावसायिकाचा राग निवळला.आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ४२० व्होल्टेजचा जबरदस्त शॉक देऊन अखेर हा ग्राहक इमारतीवरुन खाली उतरला आणि उपस्थितांसह महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला.