accident
accident

कोल्हापूर-सांगली हायवे लक्ष्मी औद्योगिक फाट्यानजीक रस्त्याकडेला नादुरूस्त थांबलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोची जोरदार धडक बसली. त्यामुळे झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले.

    हातकणंगले : कोल्हापूर-सांगली हायवे लक्ष्मी औद्योगिक फाट्यानजीक रस्त्याकडेला नादुरूस्त थांबलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोची जोरदार धडक बसली. त्यामुळे झालेल्या अपघातात (Accident in Hatkanangale) दोन युवक जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली-कोल्हापूर लक्ष्मी औद्योगिक फाट्यानजीक (एमएच ०९ सीयु ८९३३) हा नादुरूस्त ट्रक थांबला होता. कुपवाड वसाहतीमधील काम आटपून सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेला निघालेला छोटा टेम्पो (एमएच १० सीआर २९२९) लक्ष्मी औधोगिक फाट्यानजीक नादुरुस्त थांबलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने छोटा टेम्पो ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे छोटा टेम्पोमधील महंमद नौशाद (वय ४०) लल्लन सैदव (वय ३८, दोघेही रा. बिहार) हे जागीच ठार झाले. तर वाहनचालक संग्राम सुरेश हिंडेकर (वय ३१, रा. बाजार भोगाव ता. पन्हाळा) व नितेशकुमार लालमोहन सैदव (वय २१, रा.बिहार) हे जखमी आहेत.

    दरम्यान, घटनेनंतर हातकणंगले पोलीस व समर्पण सेवा संस्थेचे स्वप्नील नरुटे हे आपल्या रुग्णवाहिकासह घटनास्थळी तात्काळ हजर राहत छोटा टेम्पोमधील अडकलेले मृतदेह मोठ्या शर्थीने बाहेर काढले. ही धडक जोरात झाल्याने छोटा टेम्पोचा चुराडा झाला होता. अधिक तपास हातकणंगले पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे हे करीत आहेत.