जयसिंगपूर पालिकेवर दुसऱ्यांदा प्रशासक; शेवटची सभा न झाल्याचे नगरसेवकांना शल्य

जयसिंगपूर नगरपालिकेच्या (Jaysingpur Municipality) प्रशासकपदी मुख्याधिकारी टीना गवळी (Tina Gawali) यांची नियुक्ती झाली आहे. सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी दोन दिवस आधी नियुक्तीचे आदेश शासनाने काढले.

  जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जयसिंगपूर नगरपालिकेच्या (Jaysingpur Municipality) प्रशासकपदी मुख्याधिकारी टीना गवळी (Tina Gawali) यांची नियुक्ती झाली आहे. सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी दोन दिवस आधी नियुक्तीचे आदेश शासनाने काढले. ओमिक्रोनच्या धास्तीने व निवडणूक प्रक्रियेमुळे इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. तर परिषदेची शेवटची सभा न झाल्याचे शल्य नगरसेवकांमध्ये बोचत आहे.

  नगरपालिकेवर नगराध्यक्ष भाजप-ताराराणी आघाडीचा तर बहुमत शाहू आघाडीचे होते. या प्रक्रियेतून जाताना पाच वर्षात वेगवेगळ्या घटनाना सामोरे जावे लागले आहे. याचा अनुभव मुख्याधिकारी गवळी यांना आला आहे. अशा राजकीय परिस्थितीमुळे प्रशासनाची वारंवार कोंडी झालेली नागरिकांनीही अनुभवली आहे. सभागृहाची मुदत संपणार म्हणून नगरसेवकांसह ठेकेदारांनी नगरपालिकेतील फेऱ्या वाढवल्या होत्या. त्यातील काही कामे पूर्ण झाली असून काही जणांना माघारी फिरावे लागले आहे.

  मी पुन्हा येईन…

  सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी अंतिम सभा व्हावी अशी बहुतांशी नगरसेवकांची इच्छा होती. परंतु सभा घ्यायची, घ्यायची असे म्हणत मुदत संपून गेली. सभा का झाली नाही हा एक गूढ प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु शेवटच्या सभेत सर्व नगरसेवकांना आपले मत व्यक्त करण्याची सुप्त इच्छा राहूनच गेली आहे. यावर मार्ग काढत नगरसेवकांनी आता सोशल मीडियाचा वापर करून मतदारांचे आभार मानले आहेत. मी पुन्हा येईन असाच काही नगरसेवकांचा यातून संदेश आहे.

  इतिहासात दुसऱ्यांना प्रशासक

  यापूर्वी २००३-०४ मध्ये तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षा सावित्री कुंभार व उपनगराध्यक्ष विजय मगदूम यांच्या काळात पहिल्यांदा पालिकेवर प्रशासक नियुक्ती झाली होती. २००३-०४ च्या काळात उपनगराध्यक्ष विजय मगदूम यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात येणार होती. मात्र मगदूम यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून आदेश दिले होते.