विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना अटक; १२ लाखांचा मद्यसाठा जप्त

    कोल्हापूर : गोवा राज्यातून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक आंबोली-आजरा मार्गे होणार असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा लावून सुमारे १२ लाख किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी विनायक बाळासो खोत-पाटील (वय २७, रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल), मारुती बापू पाटील (४८, रा. केनवडे, ता. कागल) या दोघांना अटक केली. त्यांचे ताब्यातून चारचाकी पिकअप टेम्पोसह १२८ मद्याचे बॉक्स जप्त केले.

    गोवा राज्यातील विदेशी मद्याची तस्करी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असते. आजरा, राधानगरी, गगनबावडा, बेळगाव मार्गे गोव्याला जोडणाºया रस्त्यावरुन विदेशी मद्याची चोरी वाहतूक होत असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक पी. आर. पाटील यांना गोपणीय बातमी मिळाली की, गोवा राज्यातून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक आंबोली-आजरा मार्गे होणार आहे. त्यांनी भरारी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने या मार्गावर सापळा रचून शनिवारी मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या पिकअप टेम्पो (एम. एच. ०९ सी. व्ही. ७७०२) संशयितरित्या येत असलेचा दिसला.

    गवसे, ता. आजरा येथील गावच्या हद्दीतील साखर कारखान्यासमोर टेम्पो अडवून चौकशी केली असता संशयित आरोपींनी टेम्पोत काही नसल्याचे सांगितले. पथकाने खात्री केली असता टेंम्पोच्या हौद्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आले. यावेळी संशयित विनायक खोत-पाटील याने आपला स्वत:चा मुद्देमाल असल्याची कबुली दिली.

    असा आहे विदेशी मद्याचा साठा…

    विदेशी मद्याचे गोल्डन एम ब्ल्यू व्हिस्कीचे ७५० मिलीचे एकूण ६२ बॉक्स, गोल्ड अ‍ॅण्ड ब्लॅक रमचे ७५० मिलीचे ६२ बॉक्स, मॅकडॉल नंबर ०१ व्हिस्कीचे चार बॉक्स असा एकूण १२८ बॉक्स मिळून आले. बाजारभावानुसार या मद्यसाठ्याची किंमत ७ लाख ५९ हजार ८४० रुपये होते. तसेच मोबाईल आणि टेंम्पो यांचेसह एकूण ११ लाख ६४ हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.