वाळू मुरूमाच्या अवैध वाहतुकीवर मंडळ अधिकार्‍यांचा ‘वॉच’

शिरोळ तालुका (Shirol Taluka) हा गौण खनिज उत्खननमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. बऱ्याचशा ठिकाणी रॉयल्टी व्यतिरिक्त उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. त्याच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयाला करून देखील कारवाईसाठी विलंब होत होता. परंतु, आता तहसीदारांनी सात भरारी पथके नेमली.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिरोळ तालुका (Shirol Taluka) हा गौण खनिज उत्खननमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. बऱ्याचशा ठिकाणी रॉयल्टी व्यतिरिक्त उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. त्याच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयाला करून देखील कारवाईसाठी विलंब होत होता. परंतु, आता तहसीदारांनी सात भरारी पथके नेमली असून, अवैध उत्खननावर वॉच ठेवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचे आदेश तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी काढले आहेत.
    शिरोळ तालुक्यामधील आलास, औरवाड, शेडशाळ, कनवाड, उदगाव, चिंचवाड या परिसरामध्ये वीटभट्टी व्यवसायाचे मोठे प्रस्थ आहे. त्यांना लागणारी माती ही परस्पर परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने घेतली जाते. काही ठिकाणी रॉयल्टी भरून तर बऱ्याच ठिकाणी त्याहुनही अधिक उत्खनन केलेले दिसून येत आहे. वाळूचे अड्डेही मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.
    वाळू, माती मुरूम या गौण खनिजांचे अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर या वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी मंडळाधिकारी, तलाठी व कोतवाल यांची सात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
    दरम्यान, भरारी पथके खरंच कारवाईचा बडगा उगारणार की बोटचेपी भूमिका घेऊन अर्थ शोधणार हे पाहणे गरजेचे आहे. स्टोन क्रशर प्रश्नीही तालुक्यातील बडे व्यवसायिक अधिकाऱ्यांना गळ घालत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
    याठिकाणी असणार पथके
    – कागवाड फाटा व औरवाड फाटा

    – इचलकरंजी फाटा व हेरवाड फाटा
    – अर्जुनवाड पूल
    – पाचवा मैल, सदलगा फाटा
    – उदगाव पूल
    – नांदणी नाका
    – आयको मिल