काँग्रेस आमदाराच्या पत्नीला भाजपच्या उमेदवारीसाठी चंद्रकांत पाटलांचा प्रस्ताव

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे भाजपचे अतिशय चांगले संबंध होते. जाधव कुटुंबांतील दोन-दोन सदस्य भाजपचे नगरसेवक राहिले आहेत. जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवावी.

    कोल्हापूर : दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे भाजपचे अतिशय चांगले संबंध होते. जाधव कुटुंबांतील दोन-दोन सदस्य भाजपचे नगरसेवक राहिले आहेत. जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Chandrakant Jadhav) यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवावी, असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.
    चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना भाजपचे तिकीट न मिळाल्यामुळे गेल्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार झाले. त्यांचा सगळा इतिहास हा भाजपशी निगडीत आहे. त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. बंधू संभाजी जाधव हे भाजपचे नगरसेवक होते. एकेका कुटुंबांतील दोन सदस्य भाजपचे नगरसेवक याचा अर्थ जाधव कुटुंबीय आणि भाजपचे संबंध चांगले आहेत. आगामी पोटनिवडणूक जयश्री जाधव यांनी भाजपच्या चिन्हावर लढवावी अशी त्यांना विनंती करणार आहे. आज, उद्या त्यांची भेट घेणार आहे.’
    दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होत ते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनले होते. काही दिवसापूर्वीच चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.