उदगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मोठा गदारोळ; सरपंच, ग्रामसेवकांचा निषेध

उदगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मोठा गदारोळ झाला. सभेच्या सुरुवातीलाच निविदा प्रक्रिया, गावातील विकासकामे, पाणीपुरवठा योजना यावरून सरपंच व ग्रामसेवकांना सदस्यांनी कोंडीत पकडले. यावर उत्तर देताना जास्त शहाणपणा करायचा नाही या सरपंचांच्या उत्तराला सर्व सदस्यांनी आक्रमकपणे विरोध करत निषेध व्यक्त केला.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उदगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मोठा गदारोळ झाला. सभेच्या सुरुवातीलाच निविदा प्रक्रिया, गावातील विकासकामे, पाणीपुरवठा योजना यावरून सरपंच व ग्रामसेवकांना सदस्यांनी कोंडीत पकडले. यावर उत्तर देताना जास्त शहाणपणा करायचा नाही. या सरपंचांच्या उत्तराला सर्व सदस्यांनी आक्रमकपणे विरोध करत निषेध व्यक्त केला.

    उदगाव ग्रामपंचायतीची मासिक सभा गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. गेले आठ दिवस निविदा प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत चांगलीच गाजत आहे. यावर ग्रामपंचायत सदस्य मेघराज वरेकर यांच्यासह सदस्यांनी प्रश्न विचारले असता जास्त शहाणपण करायचे नाही असे उत्तर सरपंच कलीमुन नदाफ यांनी दिले. त्यावर तेरा सदस्यांनी विरोध करत अशी भाषा वापरायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला असा प्रश्न सुनीता चौगुले यांनी विचारला. त्यानंतर झालेला दंगा इतका मोठा होता की शेजारील ग्रामस्थ त्याची उलट सुलट चर्चा करत होते. त्यानंतर सदस्यानी थेट गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांचे दालन गाठले.सरपंच कलीमुन नदाफ व ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांच्या कारभाराचा लेखाजोखा व्हावा अशी आग्रही मागणी केली व पंचायत समिती येथे सरपंच व ग्रामसेवक यांच्या कारभाराचा काळ्या फिती लावून निषेध केला.

    यावेळी उपसरपंच रमेश मगदूम, ग्रा.प. सदस्य ऍड. हिदायत नदाफ, सुनिता चौगुले, मेघराज वरेकर, जगन्नाथ पुजारी, सावित्री मगदूम, दीपिका कोळी, पूजा जाधव, रुक्मिणी कांबळे, ज्योत्स्ना गडगडे, भारती मगदूम, संदीप पुजारी, आर. जी. वरेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.