कोथळी गावठाणमधील भूखंड वाटप तातडीने पूर्ण करा; राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेश

मोजणीची रक्कम शासनाला भरण्यासाठी ग्रामपंचायतींकडे कोणतीही तरतूद नसल्याने खर्च करता येत नव्हते. यासाठी डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्वखर्चातून रक्कम देण्याची भूमिका घेल्याबद्दल कोथळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

  जयसिंगपूर : महापुरापासून कोथळी गावच्या गावठाण विस्तार हद्दवाढीचा विषय प्रलंबित आहे. यासाठी गायरानमधील गट क्रमांक ११८६ मध्ये २२७ पूरग्रस्त नागरिकांसह ग्रामस्थांना भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत गावठाण विस्तार वाढीसाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे. मात्र, या जमिनी लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने या जागेची मोजणी करून भूखंड निश्चित करण्याबाबतचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
  मोजणीचा खर्च कोण उचलायचा याबाबत पेच निर्माण झाला होता. याबाबत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या् कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी मोजणीसाठी लागणारी रक्कम मी स्वतः भरायला तयार आहे. पण मोजणी पूर्ण करून कोथळीमधील गावकऱ्यांना त्यांना मंजूर झालेले भूखंड तातडीने हस्तांतरित करा, असे आदेश बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
  सातत्याने येत असलेल्या महापुरामुळे गावातील पूरबाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला होता. प्रत्येक महापुराच्या वेळी या सर्व घटकांना स्थलांतरित व्हावे लागते, सरकारने या सर्वांना जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु दिरंगाईमुळे भूखंडाचा ताबा मिळाला नसल्यामुळे अद्याप या ग्रामस्थांना स्वतःच्या सुरक्षित जागेत जाऊन राहता आले नाही. चारवेळा महापुराचा फटका या नागरिकांना बसला. मात्र, आपल्याला गावठाण विस्तार हद्दवाढीमध्ये भूखंड मिळण्याबाबत नाव असूनसुद्धा जागा मिळत नसल्याने हे लोक प्रशासकीय यंत्रणेवर नाराज होते.
  बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन येणाऱ्या दोन महिन्यात कोथळीमधील गावठाण विस्तार वाढीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला गेला पाहिजे. मंजूर असलेल्या सर्व नागरिकांना त्यांच्या भूखंडाचा ताबा देण्यासाठी आवश्यक त्या बाबी गतीने पूर्ण करा, असे आदेश राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या बैठकीमध्ये दिले.
  यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ, नायब तहसीलदार काटकर, गटविकास अधिकारी शंकरराव कवितके, भूमी अभिलेख अधिकारी माळवदे, सर्कल संजय सुतार, शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नादणे, कोथळीचे सरपंच वृषभ पाटील, ग्रामविकास अधिकारी सी. एम. केंबळे, तलाठी माळी, सतीश मलमे, ग्रा. प. सदस्य नितीन वायदंडे, शरद कांबळे, विलास कोरवी, विनोद कांबळे, उत्तम तिवडे, पोपट कांबळे यासह गावठाण विस्तार हद्दवाडीतील कोथळी गावचे ग्रामस्थ पदाधिकारी आदी उपस्थित होते.
  मोजणीसाठी स्वखर्चातून मदत
  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोथळी गावठाण विस्तार हद्दवाढीचा विषय मोजणीसाठी रखडला होता. या मोजणीची रक्कम शासनाला भरण्यासाठी ग्रामपंचायतींकडे कोणतीही तरतूद नसल्याने खर्च करता येत नव्हते. यासाठी डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्वखर्चातून रक्कम देण्याची भूमिका घेल्याबद्दल कोथळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.