हुपरी परिसरात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

    हुपरी : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात आज भारत बंद पुकारण्यात आला. याला हुपरी परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
    दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व शहरप्रमुखांसह अन्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

    आजच्या भारत बंदला हुपरीसह परिसरातील रेंदाळ, रांगोळी, इंगळी, यळगूड, तळंदगे,पट्टणकोडोली आदी गावात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हुपरी शहरात महाविकास आघाडीतील शिवसेना वगळता राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदीच्या कार्यकर्त्यांनी गावभागातील डॉ. सुभाषचंद्र बोस पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करुन जोरदार घोषणाबाजीने परिसर दणदणून गेला.

    या आंदोलनात बाळासाहेब जाधव, मानसिंग देसाई, किरत पोतदार, प्रताप जाधव, बाहुबली गाट, सुनिल गाट, विद्याधर कांबळे, राजू शिंदे, राजाराम देसाई, सुरेश पाटील, पिंटू पाच्यापुरे यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.