अद्ययावत डिजिटल वर्ग डिसेंबरअखेर पूर्णत्वास नेण्याचा निर्धार

  मुरगूड : केनवडे ता. कागल येथे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम प्राथमिक शाळेत अत्याधुनिक फ्युचरिस्टिक व्हर्च्युअल क्लासरूम उभारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी एकजुटीने व्यक्त केला. नागरिकांनी हात उंचावून निर्धार व्यक्त केला. ५० लाखांचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केनवडेकरांनी कंबर कसली आहे.

  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना फ्युचरिस्टिक क्लासरूम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहभागातून या क्लासरूमसाठी आवश्यक इमारत उभी करण्याचा निर्णय झाला. जागेची उपलब्धता यापूर्वीच करण्यात आली आहे. अत्याधुनिक डिजिटल टच स्क्रीन बोर्ड व इतर डिजिटल साहित्य खरेदी, पुढील पाच वर्षासाठी मेंटेनन्स व अध्यापक पालक प्रशिक्षण यासाठी लागणारे २८ लाख रुपये लोकसहभाग व कॉर्पोरेट सपोर्ट फंडातून उभारण्याचा निर्णय या ग्रामसभेत एकमुखाने झाला.

  या ग्रामसभेत फाऊंडेशनचे तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे, कागलचे गटशिक्षण अधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी मार्गदर्शन केले. गावसभेस सरपंच अनुराधा शिंदे, उपसरपंच तुकाराम महादेव मगदूम, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील, शाहू साखरचे संचालक डी.एस. पाटील, पोलीस पाटील वंदना सुतार उपस्थित होते.

  डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले,” जगामध्ये समाज निसर्ग यामध्ये अशा घटना घडतात. अगदी तसाच अनुभव घेण्याची ताकद लिटर शिक्षणामध्ये आहे. आपली मुले हीच आपली संपत्ती असते. खरा विकास रस्ते,वीज,पैसा यामध्ये नसून स्वतःची आणि आपल्या गावातील मुले घडवण्यात आहे.”

  संदीप गुंड म्हणाले” ज्ञान विज्ञानाच्या ज्या संकल्पना शिक्षक शब्दरूपाने स्पष्ट करू शकत नाहीत असे खगोल, विज्ञान, आरोग्य, गणित व अनेक अमूर्त विषय कृतीयुक्त डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना अवगत होतील. भविष्यात केनवडे गावास अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाचे केंद्र बनवण्याची ही सुवर्ण संधी आहे,” अशी अत्याधुनिक वर्ग खोलीसाठी अनेक गावांनी मागणी केली होती.

  दत्ता पाटील यांचे प्रयत्न व या विकासासाठी जे योग्य ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वीकारण्याची तयारी यामुळेच हा पायलट प्रकल्प केनवडेस मिळाला आहे. नागरिक या संधीचे सोने करतील अशी भावना डॉ. जी. बी. कमळकर यांनी व्यक्त केली.

  स्वागत युवराज पोवार प्रास्ताविक सुनिल चौगले, सूत्रसंचालन अवघडी शेळके यांनी केले. ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य डी.डी.पाटील, राजु तळेकर, कृष्णात एकशिंगे, संतोष पाटील, डी. एल. एकशिंगे, माया तळेकर, पांडुरंग गुरव, तुकाराम विठू मगदूम, ढोकरे गुरुजी, आनंदा पाटील, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.