ऐनदिवाळीत शिराेळमध्ये एफडीएची मोठी कारवाई; २० लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

शिरोळ तालुक्यातील हेरवाड, मजरेवाडी, टाकवडे, अकिवाट येथे छापा टाकून २० लाख २९ हजार ३२० रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक छापा टाकल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे.

  कुरुंदवाड : ऐनदिवाळीच्या तोंडावर दुग्धजन्य खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने (FDA Action in Kolhapur) कारवाई केली. शिरोळ तालुक्यातील हेरवाड, मजरेवाडी, टाकवडे, अकिवाट येथे छापा टाकून २० लाख २९ हजार ३२० रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक छापा टाकल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईची शिरोळ तालुक्यातून स्वागत होत असून, किमान दिवाळीच्या कालावधीत तरी या कारवाईमध्ये सातत्य असावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

  खव्याची दाेन लाखांची पावडर जप्त

  दिवाळी सणात दुग्धजन्य पदार्थाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीचा फायदा उठवत अनेक दुग्धपदार्थ उत्पादकांनी भेसळयुक्त पदार्थ बनवून जादा नफा मिळविण्याच्या नादात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी तालुक्यातील विविध ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये हेरवाड येथील बालाजी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथून खवा बनविण्यासाठी वापरली जाणारी २ लाख ३१ हजार ७६८ रुपये किंमतीची पावडर जप्त करण्यात आला.

  मजरेवाडीत तीन लाखाचा माल जप्त

  मजरेवाडी येथील गणेश मिल्क प्राॅडक्टवर टाकलेल्या छाप्यात २ लाख ९० हजार ३२० रुपयांचा स्किम्ड मिल्क, खवा, विनालेबलची पांढरी पावडर जप्त केला. अकिवाट येथील आमावा मिल्क प्रॉडक्ट येथून भेसळयुक्त खवा, म्हैशीचे दूध, दुधपावडर, व्हे पावडर, स्किम्ड मिल्क पावडर, पामतेलाचा साठा असा ३ लाख ७० हजार ५७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

  नमुने शासकीय प्रयोगशाळेत

  पथकाने दूध आणि खवा नष्ट केला असून, दुग्धजन्य पदार्थ आणि पावडरचे नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. ऐनदिवाळीत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्याने भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. एस. केंबळकर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अशोक कोळी, दयानंद शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.