…तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा गर्भित इशारा

    जयसिंगपूर : शेतकऱ्यांना ऊसाची एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाले आहेत. एफआरपीसाठी येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. तसेच ‘आमचा दसरा कडवट केला तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही’, असा गर्भित इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
    गेले काही दिवस केंद्र आणि राज्य सरकारवर एफआरपी विरोधात टीका होताना दिसत आहे. एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान शेतकऱ्यांच्या जीवावर येणारे आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही. पुढील महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल, स्वाभिमानी शेतकरी संघटना झोपली आहे असा गैरसमज कुणीही करू नये, असेही त्यांनी सुनावले.
    कारखानदारांनी कोणतीही सबब सांगू नये
    १५ सप्टेंबरपासून कारखाने सुरू करायला परवानगी दिली आहे. तरी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेशिवाय पश्चिम महाराष्ट्रात कारखाने सुरू होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पहिल्यांदाच साखर उद्योगाला चांगलं वातावरण आहे. ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीचा निर्णय प्रोत्साहन देणारा आहे. आता कारखानादारांना कोणतीही सबब न सांगता अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.