जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक

जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पेठवडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोरील न्यायालयात सर्वांना हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी (Shiroli MIDC Police) अटक केली. पेठवडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोरील न्यायालयात सर्वांना हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
    सुनील रंगराव पाटील, अनिल रंगराव पाटील, पंडित रंगराव पाटील व संभाजी गायकवाड ( चौघेही रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) अशी त्यांची नावे आहेत. तिघांना बुधवारी ( ता. १२ ) सायंकाळी तर संभाजी गायकवाड याला आज सकाळी अटक करण्यात आली. कोल्हापूर येथील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र माने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
    जमिनीच्या वादातून बांधकाम व्यावसायिकाला धमकावणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये पुलाची शिरोली येथील सुमारे चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चौघांना अटक झाली असून, श्रेयस सुनील पाटील, आदित्य पंडित पाटील, शिवेंद्र पंडित पाटील व त्यांच्यासोबत असणारे सुमारे आठ अनोळखी व्यक्ती अद्याप फरार आहेत.
    राजेंद्र माने यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्यावर विळा, काठीने व सत्तूरने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगातील कपडे फाडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या व्यक्तीला आमच्या शेताजवळ शेती करू देणार नाही. तुला तुझ्या शेतात पाय ठेवू देणार नाही.  पाय ठेवलासच तर तुला जिवंत ठेवणार नाही. अशा प्रकारची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली. त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. शेतात असणारे शेड आणि खताची पोती पेटवून देऊन नुकसान केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे हे तपास करत आहेत.