
कोल्हापूर : गोकूळ दुध संघाने स्व-भांडवलातून मुंबईत १९ कोटी रूपयांची जागा खरेदी केली आहे. त्याचबरोबर भविष्यात गोकूळ दुध संघाचा होणारा विस्तार लक्षात घेता संघाने रायगड येथेही १६ एकर जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ४४ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन केले आहे. या दोन्ही जागेवर केल्या जाणाऱ्या प्रोजेक्टसाठी अंदाजे ३२४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाचा प्रस्ताव वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी पत्रकार बैठकीत दिली.
गोकूळ दुध संघाची २४ सप्टेंबर रोजी ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी ताराबाई पार्क येथील कार्यालयात पत्रकार बैठकीचं आयेाजन करण्यात आले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी, या सभेसाठी जवळपास ४२०० सभासदांना सभेची लिंक पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर गतवर्षीपेक्षा यावर्षी संघाची सुमारे दोनशे कोटी रूपयांची उलाढाल जास्त झाल्याचे सांगितले.
१९ कोटींची स्वभांडवलातून गुंतवणूक
संघाने मुंबई येथे स्वतःची जागा खरेदी केली असून त्यासाठी १९ कोटी रूपयांची स्वभांडवलातून गुंतवणूक केली आहे. भविष्यात संघाच्या दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री आणि विस्तार याचा विचार करता रायगड येथील भोकरपाडा औद्योगिक वसाहतीमध्ये १६ एकर जागा खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रोजेक्टसाठी अंदाजे ३२४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याने सदर खर्चाच्या मान्यतेसाठी येत्या वार्षिक सभेत हा प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. बैठकीत वासाच्या दुधाचा प्रश्न उपस्थित झाला असता वासाच्या दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. बैठकीला ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्यासह सर्व सचांलक उपस्थित होते.