अतिवृष्टीचा सोयाबीनला फटका

    हातकणंगले : हातकणंगले तालुक्यात सर्वत्र सोयाबीन (Soybean) काढण्याचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांची सोयाबीन पिक काढण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाटच्या गावातील पिके पाण्याने कुजली आहेत. याचा बळीराजाला लाखो रुपयाचां आर्थिक फटका बसला आहे.

    गेल्यावर्षी ३ हजार रूपये क्विंटल असलेले सोयाबीनच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. या वर्षी दर ९  हजारांवर पोहोचले आहेत. मात्र, सोयाबीन खरेदी वेळी व्यापाऱ्यांकडून फॅट व काटामारीने शेतकऱ्यांची लुट सुरू आहे. तालुक्यात फिरत्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली असून, गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर, घरात जाऊन सोयाबिन खरेदी करत आहेत. सोयाबिनचे फॅटची मशीन सामान्य शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी बनली आहे. ज्यादा फॅट लागला की दर कमी व फॅट कमी लागला की दर ज्यादा अशी अकारणी केली जाते. पावसाच्या दिवसात तसेच मंद वातावरणात फॅट ज्यादा लागते. ९ हजार दर असल्याने सोयाबीन ६ अथवा ७ हजार दराने खरेदी केली जाते.

    फॅट मशिनमुळे क्विटंल मागे अडीच ते तीन हजार रुपयांची तफावत आहे. यातच हमाली, पोत्यामागे रिवाज सूट, माती सूट यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. असे असताना ग्रामीण भागातील अशीक्षीत बळीराजाला फॅटच्या नावावर कमी दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे.

    काही व्यापारी इलेक्ट्रीक वजन काटयाच्या सहाय्याने रीमोटचा वापर करून काटामारी करत शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. मुसळधार पावसामुळे पिकांना जगवण्यासाठी बळीराजाला जिवाच राण करावं लागत असताना व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट यामुळे पिकांच्या मशागत, पेरणी, काडणीसाठी घातलेला एकरी खर्च निघणे कठीण आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ही लूट रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.