मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईन? : खासदार संभाजीराजे

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं ध्येय आहे, असं सांगत हे आंदोलन मॅनेज असल्याच्या चर्चांवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उत्तर दिलं आहे. मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईल?, असं संभाजीराजे म्हणाले.

    कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं ध्येय आहे, असं सांगत हे आंदोलन मॅनेज असल्याच्या चर्चांवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उत्तर दिलं आहे. मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईल?, असं संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी मराठा समाजातील समन्वयकांसोबत हितगुज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूरमधील भवानी मंडपात दोन दिवस ही संवादाची प्रक्रिया पार पडणार आहे.

    तसेचं कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील नेते आणि समन्वयक या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. ज्यावेळी मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय आला, त्यावेळी वातावरण तणावपूर्ण न करता शांततेची भूमिका आपण घेतली, असं ते म्हणाले. त्यावेळी सगळेजण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले होते. मात्र मूळ मुद्द्यावर कुणीच बोलत नव्हतं. आरक्षण मिळवण्यासाठी वातावरणात तणाव निर्माण करण्याची किंवा स्टंटबाजी करण्याची गरज नसून कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर पद्धतीने हे काम पूर्णत्वाला नेणे गरजेचं असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

    देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गर्दी न करता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचं कुठलंही उल्लंघन न करता आपला लढा चालू ठेवण्याचं मोठं आव्हान असल्याचं संभाजीराजे म्हणाले.