जयश्री जाधव यांचा भाजपकडून निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार, प्रदेशाध्यक्ष रिकाम्या हाताने परतले

चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी भेट देत या मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी जयश्री जाधव यांना गळ घातली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप कोअर कमिटीचाही यासाठी आग्रह असल्याचे सांगितले; पण जाधव यांनी भाजपकडून लढण्यास स्पष्ट नकार दिला. जाधव कुटुंबासोबत किंवा त्याशिवाय पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

  कोल्हापूर : काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या माजी नगरसेविका व चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, भाजपकडून आलेला हा उमेदवारीचा प्रस्ताव जयश्री यांनी नाकाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडीयाने दिलं आहे.

  आमदार जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार उभा करण्यासाठी भाजपची धडपड सुरू झाली आहे. जयश्री जाधव यांची काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याची चर्चा झाली. त्यामुळे त्या काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढविणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले.

  चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी भेट देत या मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी जयश्री जाधव यांना गळ घातली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप कोअर कमिटीचाही यासाठी आग्रह असल्याचे सांगितले; पण जाधव यांनी भाजपकडून लढण्यास स्पष्ट नकार दिला.

  पंढरपूर, देगलूरप्रमाणे येथेही भाजपला विरोधात निवडणूक लढवावी लागेल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा भाजपच्या चिन्हावर न लढण्यावर त्या ठाम राहिल्या. अखेर ‘कुटुंबीयांशी चर्चा करून निर्णय कळविते,’ असे सांगितल्यावर चंद्रकांत पाटील बाहेर पडल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

  जाधव कुटुंबासोबत किंवा त्याशिवाय पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

  दरम्यान, ही जागा बिनविरोध निवडून यावी यासाठी काँग्रेस नेतृत्व सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.