
वारणानगर : बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी पंडित शंकर बच्चे यांच्या घरी चोरी करून सहा तोळे सोन्याचे दागिने आणि सहा हजार रुपये रोख रकमेसह एकूण १ लाख ८५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, बच्चे सावर्डे येथील दत्त मंदिरासमोरील पंडित शंकर बच्चे यांच्या घरी चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घराच्या पाठीमागील दरवाजातून प्रवेश करून तिजोरीतील सहा तोळे सोन्याचे दागिने आणि सहा हजार रुपये रोख रक्कमेसह एकूण १ लाख ८५ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
गावातील अन्य दोन ठिकाणी चंद्रकांत बापू बच्चे व माणिक सोनाप्पा बच्चे यांच्या घरच्या पाठीमागील दरवाजातून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल झाला. अज्ञात चोरट्यांनी चोरलेल्या वस्तूंचे घराजवळील शेतवाडीमध्ये रिकामी पाकीटे आणि पिशव्या टाकून दिल्या. त्या अस्तावेस्त स्वरूपात पहाटे लोकांच्या निदर्शनास आल्या. या घटनेची माहिती कोडोली पोलीसांना मिळताच कोडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी
कोडोली पोलिसांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर पोवार यांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.