शरद पवार यांनी मला झोळी फाटेपर्यंत दिलं : हसन मुश्रीफ

मला झोळी फाटेपर्यंत कोणी दिले असेल तर कागलच्या जनतेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं. आता मला फारशी मोठी अपेक्षा राहिलेली नाही, असे प्रत्युत्तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विरोधकांना दिले.

    कोल्हापूर : मला झोळी फाटेपर्यंत कोणी दिले असेल तर कागलच्या जनतेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं. आता मला फारशी मोठी अपेक्षा राहिलेली नाही, असे प्रत्युत्तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विरोधकांना दिले.
    महासैनिक दरबार हॉल येथे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या (Rajarshi Shahu Shetkari Vikas Aghadi) सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. छत्रपती शाहू कारखाना आणि जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे खासदार संजय मंडलिक यांनी पत्रक काढले होते. त्यांचा सल्ला आम्ही मानला, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
    बँकेवर प्रशासक असताना शेतकऱ्यांचे हाल आम्ही डोळ्यांनी पाहिलेत. त्यामुळे बँकेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायला कचरलो. यापुढे बँकेचा कारभार चांगल्याप्रकारे चालवावा हाच आपला प्रयत्न असून, विरोधकांच्या टीकेला आपण यापुढे प्रत्युत्तर देणार नाही. खासदार संजय मंडलिक यांनी आपल्यावर केलेल्या टीकेचा विषय आपण येथेच संपवत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
    आसुर्ले पोर्ले कारखान्याला दिलेल्या ९० कोटी कर्जामुळे बँकेवर प्रशासक नेमणूक झाली. पण त्यानंतर गेल्या साडेसहा वर्षाच्या कालावधीत सतारूढ आघाडीने १३४ कोटी संचित तोट्यात असलेली बँक १५० कोटी नफ्यात आणली. शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जे मिळाली. यामुळे सावकारी थांबली. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणारी ही बँक आहे. त्यामुळे सत्तारूढ आघाडीला निवडून द्या असे हसन मुश्रीफ यांनी सर्वाना आवाहन केले.