Swabhimani Shetkari Sanghatana's young district president Nivruti Shewale planted poppy in the field

शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज वितरण कंपनीने परस्पर शेतीची वीज देयके वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जवाहर सहकारी साखर कारखान्याकडून मिळालेल्या वजन पावतीमध्ये त्याचा उल्लेख असल्याने यावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज वितरण कंपनीने परस्पर शेतीची वीज देयके वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जवाहर सहकारी साखर कारखान्याकडून मिळालेल्या वजन पावतीमध्ये त्याचा उल्लेख असल्याने यावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारखान्याला जाब विचारणार असल्याचे स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी सांगितले.

    गेले वर्षभर शेतीच्या वीज बिलाबाबत वेगवेगळी आंदोलने झाली आहेत. काही शेतकऱ्यांची वीज बिले चुकीचे आली असून, ती अजूनही दुरुस्त झाली नाहीत. दुरुस्ती न करताच वीजबिलाचा तगादा शेतकऱ्यांकडे महावितरणने लावला आहे. या प्रश्नी शेतकरी संघटनांनी आवाज उठवला असून, वीज बिले दुरुस्त करून द्या शेतकरी भरायला तयार आहेत, असे आवाहन महावितरणला केले होते. परंतु साखर कारखाना व महावितरण संगनमताने शेतकऱ्याच्या परवानगीविना वीज बिल कपात केल्याचे निदर्शनास आले आहे.

    पाटील नामक शेतकऱ्याची ऊस पावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांमधून त्याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बिल कपात करण्याचा अधिकार कारखान्याला कोणी दिला? असा प्रश्न शेतकरी कारखानदारांना करत आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे , जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अप्पा एडके, अण्णा मगदूम यांच्यासह शंभर ते दीडशे शेतकरी कारखाना प्रशासनाला जाब विचारणार आहेत.

    चुकीच्या वीज बिलासंदर्भात गेले दोन वर्षाने पाठपुरावा करत आहोत. शेतकऱ्यांच्या संमतीविना परस्पर साखर कारखाना व महावितरणने विज बिल कपात केल्याचे दिसून आले आहे. अशा सर्व कारखान्याची माहिती घेऊन संबंधित कारखाना चेअरमन व प्रशासनावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करू.

    – राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.